Ganeshotsav DJ Ban Pudhari
मुंबई

Ganeshotsav DJ Ban: गणेशोत्सवात डीजे-डॉल्बीला ब्रेक! मुंबई, नवी मुंबई, पनवेलसह काही शहरांत डीजेबंदी जाहीर

गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावर नियंत्रणासाठी मुंबई, नागपूर, सोलापूर, नवी मुंबई आणि पनवेलमध्ये डीजे, डॉल्बी, हायपॉवर साऊंड सिस्टीम व लेझर लाईटच्या वापरावर निर्बंध घालण्यात आले आहेत.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: सध्या राज्यभर गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला असताना ध्वनी प्रदूषणाचा मुद्दाही चांगलाच तापला आहे. गणेशोत्सवात डीजे, डॉल्बी आणि लाऊडस्पीकरच्या कर्णकर्कश आवाजावर नियंत्रण आणावे, अशी मागणी विविध स्तरांतून होत आहे.

या पार्श्वभूमीवर मुंबई, नागपूर, सोलापूर, नवी मुंबई, पनवेल आदी ठिकाणी पोलिसांनी डीजे आणि डॉल्बीवर बंदी घातली आहे.

मुंबईत डीजे आणि लेझर लाईटस्‌सारख्या गोष्टींवर बंदी कायम असणार आहे. मागील अनेक वर्षापासून पाळला जाणारा नियम यापुढेही कायम राहणार आहे. मुंबई पोलिसांसोबत झालेल्या गणेशोत्सव समितीच्या बैठकीत यासंदर्भात एकमताने निर्णय झाला होता.

आम्ही डीजे आणि लेझर लाईटस्‌ सारख्या बाबींचा वापर करणार नाही अशी गणेशोत्सव मंडळांनी ग्वाही दिल्याची माहिती मुंबई पोलिस आयुक्त देवेन भारती यांनी दिली आहे. नागपूरचे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी डीजे, डीजे लावलेली वाहने, हायपॉवर साऊंड सिस्टीम तसेच बीम आणि लेझर लाईटस्‌च्या वापरावर निर्बंध घातले आहेत.

बीम लाईट आणि लेझर बीम लाईट अशा तीव्र प्रकाशामुळे वाहनचालकांच्या दृष्टीवर परिणाम होऊन अपघाताचा धोका निर्माण होऊ शकतो, तसेच सार्वजनिक सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी पोलिसांची भूमिका आहे. नवी मुंबई आणि पनवेल परिसरातही गणेशोत्सवात ध्वनी प्रदूषणाचे नियम पाळावेत आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी डीजे तसेच लेझर लाईटचा वापर टाळावा, असे आवाहन नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी केले आहे.

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांवर तसेच डीजेमालकांवर कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ पनवेल परिसराला लागून आहे.

या परिसरातून चोवीस तास विमानांची ये-जा सुरू असते. विमानांच्या उड्डाण आणि उतरणीच्या वेळी लेझरचा प्रकाश वैमानिकांच्या दृष्टीस अडथळा निर्माण करू शकतो. त्यामुळे गणेशोत्सवातील मिरवणुका आणि अन्य कार्यक्रमांमध्ये लेझरचा वापर टाळण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत.

सोलापूरमध्ये देखील गणेशोत्सवादरम्यान डीजे आणि डॉल्बीवर बंदी घालण्यात आली आहे. पारंपारिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करावा, डीजे आणि डॉल्बीचा उपयोग करू नये म्हणून निर्बंध घालण्यात आले आहेत.

मुख्यमंत्र्यांचे डीजे बंदीचे पुण्यात सूतोवाच

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात डीजे आणि डॉल्बीवर बंदी घालण्याचे सूतोवाच केले आहे. या बंदीची मागणी करणारे सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांना झालेल्या मारहाणीनंतर पुण्यात हा मुद्दा चांगलाच तापला आहे.

एखादा भूकंप यावा तसा आवाज होत असेल तर त्यावर बंदी घालावी यावर सर्वांचेच एकमत होत आहे. त्यामुळे गणेशोत्सव आणि येणारे अन्य सण उत्सव हे पारंपरिक पद्धतीने साजरे व्हावे म्हणून लोकांच्याच सहभागातून डीजेवर बंदी घातली जाईल, असे फडणवीस म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT