स्वप्नील कुलकर्णी
Ganesh Festival 2025
मुंबई : यंदाच्या गणेशोत्सवात गणरायाची मूर्ती पीओपीची की शाडूची, याचा फैसला सोमवारी 9 जून रोजी मुंबई उच्च न्यायालयात होणार्या सुनावणीत अपेक्षित आहे. मात्र राज्य सरकारने पीओपी बंदी लागू केल्यास मुंबईतील विविध आघाडीच्या मंडळांचे राजे आपल्या नेहमीचीच भव्यता-दिव्यता आणि उंची राखून शाडूच्या मूर्तीत दिसू शकतात. शाडूच्या मूर्तीला उंचीची मर्यादा नाही आणि या मूर्तीला दर फूटला लाखाचा खर्चही येत नसल्याचे या मंडळांनी पुढारीशी बोलताना निक्षून सांगितले.
पीओपी बंदीचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊनही मिटलेले नाही. पीओपीचा हट्ट रेटण्यासाठी एक मोठा गट काम करत असून याच गटाकडून शाडूच्या मूर्तीला अफाट खर्च येत असल्याच्या बातम्या मध्यंतरी पसरवल्या. त्या मुंबईच्या आघाडीच्या गणेश मंडळांनी आता फेटाळल्या असून पीओपी बंदी लागू झाल्यास 8-9 फूटांपासून ते 24 फूटांपर्यंतदेखील शाडूच्या मूर्ती विराजमान करण्याची तयारी दर्शवली आहे.
शाडूच्या मूर्ती तयार करण्याचे गणित वेगळे असले तरी मुळात शाडूची गणेशमूर्ती तयार करताना प्रतिफूट एक लाख रुपये खर्च येत नाही. पीओपी आणि माती हा वाद नाही. राज्य शासन काय निर्णय घेते, उच्च न्यायालयात काय होते यावर सारे अवलंबून आहे. मात्र यंदा प्रसंगी शाडूच्याच मूर्ती विराजमान करण्याची तयारी मुंबईच्या गणेश मंडळांनी सुरू केलेली दिसते. पीओपी की शाडू या कथित वादावर या मंडळांच्या भूमिका त्यांच्याच शब्दात-
पर्यावरणपूरक शाडू मातीच्या मूर्तीबाबत येत्या 9 जून रोजी होणार्या सुनावणीनंतर आम्ही त्याबद्दल निर्णय घेऊ आणि तयारीला सुरुवात करू. न्यायालय जो निर्णय देईल तो सगळ्यांनाच लागू असेल. मुळात आमच्या मंडळाची मूर्ती ठरलेली आहे. दरवर्षी आम्ही 8-9 फूट उंच गणेशमूर्ती बनवितो.अशोक राणे, अध्यक्ष, अंधेरीचा राजा गणेशोत्सव मंडळ
आमचा गेली 98 वर्षे मातीचा गणपती आहे. आमच्यासाठी हा विषय नवीन नाही. आम्ही दरवर्षी पर्यावरणपूरक गणेशोत्सवच साजरा करत आलोय. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आमच्या मंडळाचे कौतुक केले आहे. गणेशमूर्ती तयार करताना एका फुटाला एक लाख रुपये खर्च येतो, हे काही खरं नाही. मुळात इतका खर्च येतच नाही. आमची 24 फुटांची मूर्ती असते. आम्हाला तर इतका खर्च कधीच आला नाही.गणेश लिंगायत, प्रमुख कार्यवाह, गिरगावचा राजा
आमच्या मंडळाची पाहिल्यापासूनच शाडूची मूर्ती आहे. न्यायालयाच्या निर्णयाचा आदरच आहे. पण राज्य शासनानेदेखील काही सूचना द्यायला हव्या. 10-15 दिवसांत गणेशोत्सवाच्या तयारीला सुरुवात करू. आमच्या मंडळाच्या श्रींच्या मूर्तीमध्ये बदल होत नाही. ती मूर्ती 15 फुटांची असते. त्या पद्धतीने आम्ही तयारी करत असतो.आर. जी. भट, विश्वस्त, जीएसबी गणपती, माटुंगा
शाडूंच्या मूर्तीबद्दल मंडळापर्यंत कोणतीही सूचना आलेली नाही. आम्ही प्रशासनाच्या सूचनांची वाट पाहात आहोत. मंडळाची 22 जूनला सर्वसाधारण सभा आहे, त्यामध्ये आम्ही चर्चा करणार आहोत. राज्य सरकारचे शाडूमूर्तींबाबत निर्देश आले तर त्याचीही आम्ही तयारी केली आहे. आमच्या मूर्तिकारांना सांगून त्या पद्धतीची मूर्ती तयार करण्यास सांगितले आहे. पण मूर्ती तयार करण्यासाठी अमाप खर्च येत नाही हेदेखील तितकेच खरे आहे.संदीप सावंत, लालबाग गणेशोत्सव मंडळ, गणेश गल्ली
शाडूच्या मूर्तीला प्रतिफूट दीड लाख रुपये खर्च येत नाही. सर्वसामान्य गणेशभक्त एवढी महाग मूर्ती घेईल का? बाजारात एवढी महाग मूर्ती विकली गेली नाही. 10 इंचापासून 40 फुटांपर्यंत शाडूच्या मातीच्या मूर्तीची निर्मिती करता येते. पण इतका खर्च येत नाही. शंभर टक्के पर्यावरणपूरक मूर्तीचीच स्थापना व्हायला हवी. माणूस म्हणून आपण पर्यावरणाला जपायला हवं, तरच जीवसृष्टी टिकेल. अन्यथा उत्सवाच्या नावाखाली ‘पीओपी’ला हिंदुत्वाची जोड देतोय हे कितपत योग्य आहे? हे पीओपी उद्योजक स्वतःच्या फायद्यासाठी ‘पीओपी’चा उदोउदो करत आहेत.12 मे 2020 ला सर्वप्रथम पीओपी बंदी लागू करण्यात आली. त्यावेळी कोरोनाकाळ होता. त्यावेळी तत्कालीन केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सहानुभूती मिळावी म्हणून एक वर्षाची सूट दिली आणि 1 जानेवारी 2021 नंतर पीओपी मूर्ती पूर्णपणे बंद होतील, असे सांगितले. तशा सूचनाही काढल्या. पण त्याची अंमलबजावणीच झाली नाही. आता 2021, 2022, 2023,2024 चार वर्षे गेली. प्रत्येक वर्षी हेच सुरू आहे आणि आता 2025 मध्ये तेच सुरू आहे. मोठ्या संख्येने पीओपी मूर्ती बनत होत्या. स्थापन होत होत्या आणि समुद्रात, तलावात, नद्यांमध्ये या मूर्तींची विटंबना होत होती. 30 ऑगस्ट 2024 ला पर्यावरणवादी रोहित जोशी आणि काही मूर्तिकार न्यायालयात गेले. त्यानंतर 30 जानेवारी 2025 ला न्यायालयाने पुन्हा निकाल दिला, पीओपी मूर्ती बनणार नाहीत, त्याचे विसर्जन होणार नाही...
तरीही स्वतःला मूर्तिकार म्हणवून घेणार्या काही पीओपी निर्मात्यांनी परळ येथे महासंमेलन घेतले. तेथे राज्याचे सांस्कृतिक मंत्री अॅड.आशिष शेलार आणि मंत्री अदिती तटकरे उपस्थित होत्या. त्यावेळी मोठी आश्वासने देण्यात आली. पण त्यांना विसर्जनानंतर मूर्तींची होणारी विटंबना मान्य आहे का? तेव्हा त्यांचे हिंदुत्व कुठे जाते? केंद्रात, राज्यात हिंदुत्ववादी सरकार आहे ना? तरीही अशी परिस्थिती निर्माण होते. ‘पीओपी’मुळे अनेक मूर्तिकार संपले. अनेकांनी काम बंद केले. न्यायालयात हा विषय तीनदा गेला आहे. प्रत्येक वेळेला तो नाकारला गेला.आता नऊ जूनला जो निर्णय येईल ते सर्वांना लागू असेल.वसंत राजे, संस्थापक अध्यक्ष, श्री गणेश मूर्तिकला समिती.