Mumbai Ganeshotsav 2025 : शाडूची गणेशमूर्ती दीड लाख रुपये फूट !

पैसे आणायचे कुठून? सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे टेन्शन वाढले
Mumbai Ganeshotsav 2025
Mumbai Ganeshotsav 2025 : शाडूची गणेशमूर्ती दीड लाख रुपये फूट !Pudhari File Photo
Published on
Updated on
राजेश सावंत

मुंबई : हायकोर्टाच्या निर्देशाचे पालन करत, मूर्तिकारांनी शाडूच्या मूर्तींना प्राधान्य दिले आहे. पण त्यांच्यापुढे मोठी आर्थिक अडचण निर्माण झाली आहे. शाडूच्या मोठ्या गणेशमूर्तींची किंमत प्रतिफूट दीड लाख रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे 10 फुटाची गणेशमूर्ती घ्यायची झाली तरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना 15 लाख रुपये मोजावे लागणार आहेत. इतके पैसे आणायचे कुठून, असा प्रश्न मंडळांना पडला आहे.

गणपतीबाप्पाचे 27 ऑगस्टला आगमन होणार असल्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी आपल्या मूर्ती आरक्षित करण्यास सुरुवात केली आहे. मात्र मूर्तिकारांकडे या मूर्ती आरक्षित करण्यास गेलेल्या मंडळाच्या पदाधिकार्‍यांना मूतीर्र्ंच्या किमती ऐकूनच घाम फुटला आहे. शाडूच्या मातीपासून गणेशमूर्ती घडवताना अधिक मेहनत, त्याशिवाय खर्चही जास्त असल्यामुळे मूर्तिकारांनी थेट मोठ्या गणेशमूर्तीची किंमत प्रतिफूट दीड लाख रुपये ठेवली आहे. त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी आल्या पावली परत जात आहेत. मुंबईतील काही अपवाद वगळता अन्य कोणत्याच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना एवढ्या महाग मूर्ती आर्थिकदृष्ट्या परवडणार्‍या नाहीत. त्यामुळे आतापर्यंत मोठ्या मूर्तींची ऑर्डर देण्यात आलेली नाही.

मुंबई शहर व उपनगरांत 5 फुटांपासून 30 फुटांपर्यंत सार्वजनिक गणेशमूर्तीं साकारल्या जातात. यात 8 ते 15 फूट उंचीच्या सर्वाधिक गणेशमूर्ती आहेत. फुटामागे दीड लाख रुपये किंमत लक्षात घेता आठ ते पंधरा फूट उंचीच्या गणेश मूर्तीसाठी 12 ते 22 लाख रुपये मोजावे लागणार आहेत. अनेक मंडळांचा संपूर्ण उत्सवाचा खर्च 8 ते 10 लाख रुपये असताना मूर्तीवरच एवढ्या मोठ्या प्रमाणात खर्च झाला तर अन्य गोष्टींसाठी पैसे आणायचे कुठून, असा प्रश्न मंडळांना पडला आहे. उत्सव जवळ येत असल्यामुळे मूर्ती आरक्षित करणे आवश्यक आहे. पण मूर्तीची किंमत बघता मंडळांना ते शक्यही नाही. त्यामुळे यंदाच्यागणेशोत्सवात मोठ्या मूतीर्र्ंची संख्या घटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मंडळांचा पीओपीसाठी आग्रह

शाडूच्या मूर्ती परवडणार्‍या नसल्यामुळे सर्वच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पीओपी गणेशमूर्तीसाठी आग्रह धरला आहे. पण मूर्तिकारांनी महानगरपालिका व हायकोर्टाच्या निर्देशाचे पालन करण्यासाठी पीओपी मूर्ती न घडवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

9 जूनला फैसला होणार का ?

पीओपी की पर्यावरणपूरक मूर्ती याबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात 9 जूनला सुनावणी होणार आहे. समुद्र, वाहत्या नद्या व अन्य मोठ्या जलस्रोतांमध्ये नैसर्गिक रंगाने रंगवलेल्या पीओपी मूर्ती विसर्जित करण्यास हरकत नसावी असा निष्कर्ष राजीव गांधी विज्ञान-तंत्रज्ञान आयोगाने काढला आहे. त्यामुळे हायकोर्ट आता काय निर्णय घेणार याकडे मंडळांसह मूर्तिकारांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news