Ganesh Naik Navi Mumbai  Pudhari
मुंबई

Political News: सहा महिन्यांत मोठ्या राजकीय घडामोडी; वनमंत्री गणेश नाईक यांच्या दाव्‍याने खळबळ

गणेश नाईक यांच्या विधानावर गुलाबराव पाटील यांचा टोला; प्रतापराव जाधव यांनी एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेचा उल्लेख करत भाजपच्या सत्तेवर भाष्य केले.

पुढारी वृत्तसेवा

नवी मुंबई: राज्याच्या राजकारणात येत्या पाच-सहा महिन्यांत बऱ्याच मोठ्या घडामोडी घडतील, असे भाकीत वनमंत्री गणेश नाईक यांनी केले. शनिवारी वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात आयोजित गणेशोत्सव स्पर्धा आणि पारितोषिक वितरण समारंभानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी हे विधान केले. आपण केलेली भाकिते काही काळाने का होईना, खरी ठरत असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.

राज्यात सध्या मराठा नेते मनोज जरांगे यांनी प्रसिद्ध केलेल्या ध्वनिमुद्रित संभाषणाची चर्चा सुरू असतानाच वनमंत्री गणेश नाईक यांनी माध्यमांशी बोलताना केलेल्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात निरनिराळ्या चर्चांना उधाण आले आहे.

सध्या राजकीय वर्तुळात आणि दूरचित्रवाणीवर ज्या घडामोडींची चर्चा सुरू आहे, त्यांच्याशी आपल्या वक्तव्याचा थेट संबंध नसल्याचे नाईक यांनी स्पष्ट केले असले तरी आगामी पाच-सहा महिन्यांत राजकारणात मोठ्या घडामोडी घडतील, असे त्यांनी ठामपणे सांगितले आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यात शीतयुद्ध सुरू आहे. या पार्श्वभूमीवर नाईक यांनी केलेल्या विधानाची चर्चा सुरू झाली आहे. आपण १९९० सालापासून जे भाकीत करत आलो आहोत, ते थोड्या उशिराने का होईना, पण खरे ठरते, असा दावा नाईक यांनी केला आहे.

या घडामोडी नेमक्या कोणत्या स्वरूपाच्या असतील, कोणत्या राजकीय पक्षांशी संबंधित असतील किंवा राज्यातील राजकीय समीकरणांमध्ये यामुळे काही बदल होतील का, याबाबत त्यांनी अद्याप कोणतीही स्पष्टता दिली नसली तरी त्यांच्या या विधानामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली असून, सर्वांच्याच मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.

मी भाकितांवर विश्वास ठेवत नाही : गुलाबराव पाटलांचा टोला

राज्यात मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता असल्याचे वक्तव्य भाजपचे नेते आणि मंत्री गणेश नाईक यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर शिवसेनेचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया देताना राजकीय भाकितांवर विश्वास नसल्याचे स्पष्ट केले.

‘उलथापालथ व्हायला काही तो भूकंप आहे काय?’ असा सवाल करत त्यांनी गणेश नाईक यांच्या वक्तव्याला अप्रत्यक्षपणे टोला लगावला. राज्याच्या राजकारणात काय बदल होतील, हे भविष्यात स्पष्ट होईल. मात्र, कोणाच्या भाकितामुळे राजकीय घडामोडी घडतात, असे मला वाटत नसल्याचे पाटील यांनी सांगितले.

शिंदेंनी हिंमत केली नसती तर भाजपला सत्ता दिसली नसती

एकनाथ शिंदेंनी ती हिंमत केली नसती तर भाजपला आज सत्ता दिसली नसती, असेही विधान केंद्रीय राज्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते प्रतापराव जाधव यांनी केले. जाधव म्हणाले, आम्ही ५० लोकांनी भाजपला मदत केली म्हणून भाजप सत्तेत आली.

भाजपने महाराष्ट्रात कमी आमदार आहेत म्‍हणून शिंदेना मुख्यमंत्री केले नाही; तर बिहारमध्येही कमी आमदार असूनही नितीश कुमार यांना मुख्यमंत्री केले. जर प्रवीण दरेकरांना आक्षेप घ्यायचा असेल तर त्यांनी एनडीएच्या नेत्यांवर व त्यांच्या निर्णयावर आक्षेप घ्यावा. मात्र एकनाथ शिंदे यांचा गळा इतका नाजूक नाही की, तो कुणी केसाने कापेल. जे काही चाललं आहे ते चांगलं नाही, असेही जाधव म्‍हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT