मुंबई : गणेशोत्सवाच्या काळात गर्दीच्या व्यवस्थापनासाठी मध्य रेल्वेने विशेष नियोजन केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे आणि पनवेल स्थानकांवर व्यावसायिक निरीक्षक तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय स्थानकांवर गणेशभक्तांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
प्रवाशांच्या सोयीसाठी, चिंचपोकळी, करी रोड, भायखळा, परळ, दादर, कॉटन ग्रीन, वडाळा रोड, ठाणे आणि पनवेल स्थानकांवर अतिरिक्त तिकिट सुविधेसाठी 30 मोबाइल-यूटीएस मशीन वितरित करण्यात आल्या आहेत. दहा दिवसांसाठी चिंचपोकळी, करी रोड, भायखळा, परळ, दादर आणि कॉटन ग्रीन स्थानकांवर मोबाइल-यूटीएस आणि यूटीएस अॅप प्रमोशनल टीम तैनात केल्या आहेत. चिंचपोकळी आणि करी रोड स्थानकांवर दोन अतिरिक्त यूटीएस विंडो सुरू केल्या आहेत. प्रवाशांना मदत करण्यासाठी या स्थानकांवर अतिरिक्त सहाय्यकांची देखील नियुक्ती केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, ठाणे, लोकमान्य टिळक टर्मिनस, दिवा, कल्याण आणि पनवेल स्थानकांवर प्रमुख ठिकाणी गणपती स्पेशल गाड्यांचे बॅनर आणि स्टँड लावण्यात आले आहेत.
या गाड्यांची जाहिरात वर्तमानपत्रे आणि सोशल मीडियाद्वारे देखील केली जात आहे. नियमित घोषणा सुरळीत पार पाडण्यासाठी मुख्य व्यावसायिक निरीक्षक (घोषक) केंद्रीय घोषणा कक्षात तैनात करण्यात आले आहेत.