

रोहे प्रतिनिधीः आगामी गणेशोत्सवानिमित्त भारतीय रेल्वेने २०२५ सालासाठी तब्बल ३८० विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. ही आतापर्यंतची विक्रमी संख्या असून, यामुळे सणासुदीच्या काळात प्रवाशांचा प्रवास अधिक सुकर आणि आरामदायी होण्यास मदत होईल. यापूर्वी २०२३ मध्ये ३०५, तर २०२४ मध्ये ३५८ विशेष गाड्या चालवण्यात आल्या होत्या.
मध्य रेल्वेने एकट्याने ३०२ विशेष सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. महाराष्ट्र, विशेषतः कोकण विभागातील प्रवाशांची प्रचंड गर्दी आणि वाढती मागणी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
उत्सव कालावधी आणि गाड्यांचे नियोजन
यंदा गणेशोत्सव २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर २०२५ या कालावधीत साजरा होणार आहे. संभाव्य गर्दी लक्षात घेऊन, रेल्वेने २२ ऑगस्ट २०२५ पासूनच विशेष गाड्या चालवण्यास सुरुवात केली आहे. सण जसजसा जवळ येईल, तसतशी गाड्यांची संख्या टप्प्याटप्प्याने वाढवण्यात येणार असल्याचेही रेल्वेने स्पष्ट केले आहे.
पनवेल-चिपळूण मार्गावर ६ अनारक्षित विशेष गाड्या
या ३८० गाड्यांमध्ये पनवेल ते चिपळूण दरम्यान ६ अनारक्षित विशेष सेवांचाही समावेश आहे. या गाड्यांचे वेळापत्रक खालीलप्रमाणे:
गाडी क्रमांक ०११५९ (पनवेल - चिपळूण): ही अनारक्षित विशेष गाडी दिनांक ०५, ०६ आणि ०७ सप्टेंबर २०२५ रोजी पनवेलहून सायंकाळी ४:४० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री ९:५५ वाजता चिपळूणला पोहोचेल. (एकूण ३ फेऱ्या)
गाडी क्रमांक ०११६० (चिपळूण - पनवेल): ही अनारक्षित विशेष गाडी दिनांक ०५, ०६ आणि ०७ सप्टेंबर २०२५ रोजी चिपळूणहून सकाळी ११:०५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी सायंकाळी ४:१० वाजता पनवेलला पोहोचेल. (एकूण ३ फेऱ्या)
थांबे: सोमटणे, आपटा, जिते, पेण, कासू, नागोठणे, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापे वामणे, करंजाडी, विन्हेरे, दिवाणखवटी, कळंबणी बुद्रुक, खेड आणि अंजनी.
तिकीट बुकिंग आणि अधिक माहिती
या अनारक्षित गाड्यांचे तिकीट बुकिंग 'यूटीएस प्रणाली' (UTS System) द्वारे करता येईल आणि त्यासाठी सामान्य अनारक्षित तिकीट दर लागू असतील.
सर्व विशेष गाड्यांच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळापत्रकासाठी प्रवासी www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊ शकतात किंवा NTES ॲप डाउनलोड करू शकतात. याशिवाय, IRCTC वेबसाइट आणि ॲपवरही सविस्तर माहिती उपलब्ध आहे.