11th admission  file photo
मुंबई

11th Admission : अकरावी प्रवेशाचे रडगाणे दुसऱ्या दिवशीही कायम !

अकरावी प्रवेश वेळापत्रक बदलले, पहिली यादी 29 मे रोजी जाहीर होणार

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : राज्याच्या अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचा बोजवारा उडाल्याचे चित्र सलग दुसऱ्या दिवशीही दिसले. गुरुवारी झालेल्या गोंधळामुळे मुदतवाढ देण्यात आली; मात्र शुक्रवारी परिस्थितीत सुधारणा झाली नाही. संकेतस्थळ संथ झाल्याने पालकांतून संताप व्यक्त होत आहे. विद्यार्थी आणि पालकांना संकेतस्थळावर लॉगिन, नोंदणी, पसंतीक्रम भरणे, अर्ज लॉक करण्यास अडचणींचा सामना करावा लागल्याने संचालनालयाने नव्याने सुधारित वेळापत्रक जाहीर केले.

प्रवेश प्रक्रियाची जबाददारीचे दुसरे वर्ष असूनही तांत्रिकदृष्ट्या हाताळण्यात अपयशी ठरत असल्याने पालकांनी काय करायचे असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे 10 एप्रिलपासून सुरू झालेल्या शून्य फेरीत 20 मेपर्यंत तब्बल 9 लाख 54 हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यावेळी कोणतीही मोठी अडचण आली नव्हती. मात्र आता मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेत सहभागी होताच व अर्जाचा भाग दोन भरताना आता अडचणी येत आहेत.

अकरावी प्रवेशाच्या नियमित फेरीच्या शुक्रवारी दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी दिवसभर लॉगिन करण्याचा प्रयत्न केला; मात्र संकेतस्थळ सतत हँग होणे, लॉगिनदरम्यान बाहेर फेकले जाणे, फॉर्ममधील माहिती गायब होणे, पेमेंट होऊनही ‌‘पेंडिंग फॉर पेमेंट‌’ असा संदेश दिसणे, तर अनेकांना कॉलेज पर्यायच न दिसणे, अशा गंभीर तक्रारी समोर आल्या. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांनी ‌‘क्वालिफिकेशन डिटेल‌’ भरल्यानंतर पुढील संपूर्ण माहिती ब्लँक होत असल्याने पालकांना पुन्हा पुन्हा अर्ज भरावा लागत होता.

मुंबई विभागातील चर्नीरोड येथील उपसंचालक कार्यालयात गुरुवारी झालेल्या गोंधळामुळे शुक्रवारी सकाळपासून पालकांची मोठी गर्दी झाली होती. अनेक पालक संतप्त अवस्थेत कार्यालयात धाव घेत होते. गुरुवारच्याहून अधिक बिकट स्थिती असल्याने काही पालकांना ‌‘उद्या सकाळी या‌’ असे सांगत परत पाठविल्याचेही समोर आले.

संकेतस्थळ संथ झाल्याने पालकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.मुंबईसह राज्यातील ग्रामीण भागातही हीच परिस्थिती असून लाखो विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत अडथळे येत आहेत. विद्यार्थ्यांनी सकाळपासून अनेक वेळा प्रयत्न करूनही संकेतस्थळ उघडत नसल्याच्या तक्रारी सातत्याने येत आहेत. वारंवार लॉगीन करुनही प्रवेश प्रक्रिया पूर्ण होत नसल्याने विद्यार्थी आणि पालक पूर्णपणे हैराण झाले आहेत.

पसंतीक्रम देवून अर्ज अंतिम करणे महत्त्वाचे

राज्यात अकरावी प्रवेशासाठी 9 हजार 583 महाविद्यालये आहेत. या महाविद्यालयातील एकूण 21 लाख 98 हजार 586 जागापैकी कोट्यातील 39 हजार 613 प्रवेश झाले असून अजून 21 लाख 58 हजार 973 जागा रिक्त आहेत. आतापर्यंत 11 लाख 10 हजार 606 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. मात्र अनेकांनी नियमित फेरीसाठी अर्जाचा भाग दोन भरलेला नाही. हा अर्ज भरताना आता अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पसंतीक्रम देवून अर्ज अंतिम करणे हा या टप्यातील महत्वाचा भाग आहे. एवढी मोठी प्रवेश प्रक्रिया असताना मात्र शालेय शिक्षण विभागाकडून संबधित एजन्सीला पाठबळ उलट पाठबळ दिले जात असल्याचा संशय आहे.

अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक असे...

  • नवीन विद्यार्थ्यांची नोंदणी व भाग-1 मधील दुरुस्ती : 21 मे सकाळी 8.00 ते 25 मे सायंकाळी 6.00 पर्यंत

  • विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम अर्ज भाग-2 भरणे : 26 मे ते 28 मे

  • पहिल्या कॅप फेरीची प्रवेश वाटप यादी जाहीर : 29 मे रोजी सकाळी 11.00 वा.

  • विद्यार्थ्यांच्या लॉगिनमध्ये महाविद्यालय वाटप तपशील, कटऑफ व यादी प्रसिद्ध : 29 मे

  • विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित करणे, कागदपत्र पडताळणी व शुल्क भरणे : 29 मे दुपारी 12.00 ते 3 जून सायंकाळी 6.00 पर्यंत

  • डेटा प्रोसेस : 4 जून

  • दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर : 5 जून

  • रिक्त जागा प्रदर्शित करणे : 5 जून सायंकाळी 6.00 वा.

  • रिक्त जागांची अंतिम माहिती प्रसिद्ध : 6 जून सकाळी 11.00 वा

विद्यार्थी, पालक आणि महाविद्यालयांना मनस्ताप देणारी ही संपूर्ण प्रक्रिया ठरत आहे. संकेतस्थळ सुरळीत चालत नसल्याने प्रयत्न करूनही प्रवेश होत नाही. शासन एकीकडे सर्वांना शिक्षणाची हमी देत असताना दुसरीकडे अशा त्रासदायक प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांना शाळाबाह्य करण्याची वेळ येत आहे. ज्या कंपनीला हे काम दिले आहे, त्या कंपनीला राज्य सरकारने जाब विचारून कारवाई करावी.
सुशिल शेजुळे, सदस्य, मराठी अभ्यास केंद्र

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT