

मुंबई: इयत्ता अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेस सुरुवात होताच विद्यार्थ्यांसमोर शाळा सोडल्याचा दाखला आणि मूळ गुणपत्रिकेचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. राज्य मंडळ, सीबीएसई आणि आयसीएसईच्या अनेक विद्यार्थ्यांकडे अद्याप आवश्यक कागदपत्रे उपलब्ध नसल्याने हमीपत्राच्या आधारे अर्ज भरावे लागत आहेत. त्यातच प्रवेश प्रक्रियेचे संकेतस्थळ पहिल्याच दिवशी तांत्रिक बिघाडामुळे ठप्प झाल्याने विद्यार्थी आणि पालकांची मोठी गैरसोय झाली.
इयत्ता अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या शून्य फेरीसाठी अर्ज भरण्यास सोमवारी (11 मे) सुरुवात झाली; मात्र पहिल्याच दिवशी प्रवेश प्रक्रियेच्या संकेतस्थळाने विद्यार्थी आणि पालकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले. सकाळपासून संकेतस्थळ सुरू होत नसल्याने अनेकांना अर्ज भरता आला नाही, दुपारनंतर संकेतस्थळ सुरू झाल्यानंतर प्रवेश प्रक्रिया काही प्रमाणात सुरळीत झाली आहे.
राज्यभरातील 9 हजार 584 कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीसाठी तब्बल 21 लाख 92 हजार 36 प्रवेश क्षमता उपलब्ध आहे. त्यापैकी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत 17 लाख 12 हजार 513 जागा, तर कोटा अंतर्गत 4 लाख 79 हजार 523 जागा आहेत. उपलब्ध जागांच्या तुलनेत विद्यार्थ्यांची संख्या कमी असतानाही प्रवेश प्रक्रियेतील तांत्रिक अडचणींमुळे पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये नाराजी वाढली आहे.
राज्य मंडळाचा दहावीचा निकाल 8 मे रोजी जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी अकरावी प्रवेशासाठी अर्ज भरण्यास सुरुवात केली आहे. अर्ज सादर करताना शाळा सोडल्याचा दाखला आणि गुणपत्रिका अपलोड करणे बंधनकारक करण्यात आले आहे. प्रत्यक्षात अनेक विद्यार्थ्यांकडे अद्याप शाळा सोडल्याचा दाखला उपलब्ध नसल्याने राज्य मंडळातील विद्यार्थी हमीपत्राच्या आधारे अर्ज भरत आहेत.
सीबीएसई आणि आयसीएसई मंडळाच्या विद्यार्थ्यांचीही हीच अवस्था असून, त्यांच्याकडेही शाळा सोडल्याचे दाखले उपलब्ध नसल्याने हमीपत्राच्या आधारे अर्ज सादर केले जात आहेत. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेत तांत्रिक आणि कागदपत्रांची दुहेरी कोंडी निर्माण झाली आहे. आयजीसीएसई आणि आयबी मंडळाच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे.
या मंडळांचे निकाल 19 मे रोजी जाहीर होणार असल्याने त्या विद्यार्थ्यांना शून्य फेरीत सहभागी होता येणार नाही. त्यामुळे संबंधित पालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे निकालच उशिरा लागणार असेल, तर विद्यार्थ्यांना पहिल्या टप्प्यातून वंचित का ठेवले जाते? असा सवाल पालकांकडून उपस्थित केला जात आहे.
याशिवाय 19 मे रोजी शून्य फेरीची गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर राज्य मंडळ, सीबीएसई आणि आयसीएसईच्या विद्यार्थ्यांना वेळेत मूळ गुणपत्रिका आणि शाळा सोडल्याचे दाखले मिळणार का, याबाबतही संभ्रम आहे. कारण आवश्यक कागदपत्रांशिवाय कनिष्ठ महाविद्यालयांना विद्यार्थ्यांचे प्रवेश ऑनलाइन निश्चित करता येणार नाहीत. परिणामी प्रवेश प्रक्रियेत मोठा गोंधळ निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रवेश प्रक्रियेत निर्माण झालेल्या या अडचणी लक्षात घेता शासनाने तातडीने स्पष्ट आदेश आणि पर्यायी व्यवस्था जाहीर करावी, अशी मागणी कनिष्ठ महाविद्यालयांकडून करण्यात येत आहे.