मुंबई : दिवाणी दावा निकाली काढण्यासाठी एका व्यावसायिकाकडून घेतलेल्या सुमारे 74 लाखांचा अपहार करुन फसवणूक केल्याप्रकरणी वैभव परेश ठक्कर या भामट्याविरुद्ध सांताक्रुज पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. वैभवने तो मुख्यमंत्र्याचा खासगी स्वीय सहाय्यक तसेच त्याची पत्नी मुंबई पोलीस दलात पोलीस उपायुक्त म्हणून काम करत असल्याची बतावणी केली होती.
37 वर्षांचे तक्रारदार व्यावसायिक असून ते सांताक्रुज येथे त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतात. काही महन्यांपूर्वी त्यांनी सतीश शर्मा यांच्याविरुद्ध दिडोंशी सत्र न्यायालयात चार दिवाणी दावे दाखल केले होते. त्यांच्या एका मित्राने त्यांची वैभव ठक्करविषयी माहिती दिली होती. या माहितीनंतर त्यांनी वैभवची भेट घेतली होती. यावेळी त्याने दिवाणी दाव्यात मदत करण्याचे आश्वासन दिले होते. मार्च महिन्यात त्याने पैशांची मागणी केली होती. त्यामुळे त्यांनी त्याला टप्याटप्याने 74 लाख रुपये दिले होते. त्यानंतरही तो त्यांच्याकडे 76 लाख लाखांची मागणी करत होता. पैसे न दिल्यास केसचा निकाल त्यांच्या विरोधात लावण्याची धमकी देत होता. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी त्याच्याकडे पैशांची मागणी सुरू केली होती. मात्र त्याने त्यांना पैसे दिले नाही. त्यामुळे त्यांनी घडलेला प्रकार सांताक्रुज पोलिसांना सांगून वैभव ठक्करविरुद्ध तक्रार केली होती.