Inauguration of railway project by Prime Minister Narendra Modi
रेल्वे प्रकल्पाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या हस्ते उदघाटन Pudhari Photo
मुंबई

तुर्भे येथे गतीशक्ती मल्टीमॉडल कार्गो टर्मिनल, कल्याण यार्डरिमॉडेलिंगची पायाभरणी

पुढारी वृत्तसेवा

मुंबई पुढारी वृत्तसेवा : नवी मुंबईतील तुर्भे येथे गतीशक्ती मल्टीमॉडल कार्गो टर्मिनल आणि कल्याण यार्ड रिमॉडेलिंगची पायाभरणी, एलटीटी येथील नवीन प्लॅटफॉर्म आणि सीएसएमटी स्थानकातील प्लॅटफॉर्म 10-11 चा विस्तार पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवार (दि.13) देशाला अर्पण करणार आहेत. महामुंबईत आठ ठिकाणी तर राज्यातील पुणे, भुसावळ, नागपूर आणि सोलापूर विभागात देखील ‘गतिशक्ती मल्टिमॉडेल कार्गो टर्मिनल’ उभारण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. यामुळे शेतमाल आणि इतर जीवनावश्यक वस्तूची वेगवान आणि किफायतशीर दरात वाहतूक होणार आहे.

देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रधानमंत्री गतिशक्ती योजनेची घोषणा केली होती. त्यानुसार रेल्वे मंत्रालयाने डिसेंबर 2021 मध्ये मालवाहतुकीला चालना देण्यासाठी गतिशक्ती मल्टिमॉडेल कार्गो टर्मिनल धोरण जाहीर केले. 2024 डिसेंबरअखेर देशात 100 कार्गो टर्मिनल उभारण्याचे रेल्वेचे नियोजन आहे. रस्ते वाहतुकीच्या तुलनेत रेल्वे वाहतूक अधिक वेगवान आणि तुलनेने स्वस्त आहे. त्यातच सध्या मालवाहतुकीसाठी असलेल्या रेल्वे टर्मिनलची संख्या कमी पडत आहे. त्यामुळे रेल्वेने नवीन कार्गो टर्मिनल उभारण्यावर भर दिला आहे.

नवी मुंबईतील तुर्भे येथे गती शक्ती मल्टी मॉडेल कार्गो टर्मिनलआणि कल्याण यार्ड रिमॉडेलिंगची पायाभरणी पंतप्रधान करणार आहेत. कल्याण यार्डमुळे लांब पल्ल्याच्या आणि उपनगरीय लोकल वाहतूकीसाठी स्वतंत्र मार्ग मिळणार आह. रीमॉडेलिंगमुळे अधिक गाड्या हाताळण्यासाठी यार्डची क्षमता वाढेल, गर्दी कमी होऊन जादा लोकल चालविणे शक्य होणार आहे. तुर्भे गती शक्ती मल्टीमॉडल कार्गो टर्मिनल 32 हजार 600 चौरस मीटरपेक्षा जास्त क्षेत्रात बांधले जाईल. यामुळे स्थानिक लोकांना अतिरिक्त रोजगाराच्या संधी मिळतील. सिमेंट आणि इतर वस्तूंच्या हाताळणीसाठी अतिरिक्त टर्मिनल म्हणून याचा वापर होणार आहे.

एलटीटी येथील नवीन प्लॅटफॉर्म आणि सीएसएमटी स्थानकातील प्लॅटफॉर्म 10-11 चा विस्तार पंतप्रधान देशाला समर्पित करतील. एलटीटी स्थानकातील नवीन प्लॅटफॉर्ममुळे जादा गाड्या चालविणे शक्य होणार आहे. तर सीएसएमटी स्थानकातील प्लॅटफॉर्मचा विस्तार केल्याने 24 डब्यांच्या मेल-एक्सप्रेस चालविता येणार आहेत.

शेकडो रोजगार मिळणार

कार्गो टर्मिनलमधून अन्नधान्य, बि-बियाणे, सिमेंट, स्टील, टाईल्स, कंटेनर आणि विविध प्रकारच्या वस्तूंची वाहतूक होणार आहे. एक मालगाडी 40 ते 50 डब्यांची असते. ही एक मालगाडी रिकामी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची आवश्यकता भासणार आहे. त्यात मजूर, सुरक्षा रक्षक, क्रेन चालवणारे चालक अशा सुमारे 400 कर्मचार्‍यांची गरज लागणार आहे. यातून मोठ्या प्रमाणात मुंबईत आणि राज्यात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.

मार्गाची जोड, प्रवासी वाहतुकीची सोय

महामुंबईतील आठ कार्गो टर्मिनलला पनवेल-कर्जत उपनगरी रेल्वे आणि बेलापूर-खारकोपर-उरण मार्गाची जोड देण्यात येणार आहे. त्यामुळे टर्मिनलचा वापर मालवाहतुकीसोबतच आपत्कालीन परिस्थितीत प्रवासी वाहतुकीसाठी देखील करता येईल.

SCROLL FOR NEXT