मुंबई : गोट इंडिया टूर अंतर्गत अर्जेंटिनाचा जगप्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी रविवारी मुंबईत येत आहे. आपल्या मुंबई भेटीमध्ये तो वानखेडे आणि ब्रेबॉर्न स्टेडियमवर कार्यक्रमात सहभागी होईल. मात्र, शनिवारी मेस्सीचे दर्शनही घडले नाही, तो साधा दिसलादेखील नाही म्हणून शनिवारी कोलकात्यात त्याच्या चाहत्यांनी प्रचंड गोंधळ घातला, स्टेडियममध्ये नासधूस केली. या पार्श्वभूमीवर मुंबईतील आयोजकांसह सुरक्षा यंत्रणाही सावध झाल्या आहेत.
मेस्सी हा हैदराबाद येथून दुपारी क्रिकेट क्लब ऑफ इंडिया (सीसीआय) येथे पोहोचेल. तिथे दुपारी 3:30 ते 3:45 या वेळेत होणाऱ्या पॅडल कपमध्ये सहभागी होणार आहे. यानंतर वानखेडे स्टेडियमवर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाची सुरुवात सायंकाळी 4:30 वाजता कलाकारांच्या सादरीकरणाने होईल. त्यानंतर सायंकाळी 5 वाजता सेलिब्रिटी फुटबॉल सामना होईल. मेस्सी हा 5:30 वाजता व्हीआयपी बॉक्समध्ये मान्यवरांना भेटेल. त्यानंतर मैदानावर चाहत्यांशी संवाद साधेल.
सायंकाळी 6 वाजता मेस्सी हा मुंबई भेटीचा मुख्य सामाजिक कार्यक्रम असलेल्या महाराष्ट्र सरकारच्या महादेव प्रकल्प अंतर्गत निवडलेल्या 30 मुले आणि 30 मुलींसाठीच्या 30 मिनिटांच्या फुटबॉल मार्गदर्शन सत्रामध्ये सहभागी होईल. सायंकाळी 6:30 वाजता मेस्सी आणि विक्रमवीर सचिन तेंडुलकर यांना एकत्र पाहण्याचा खास क्षण अनुभवता येईल. सायंकाळी 6:45 वाजता सुरू होणाऱ्या राज्य सरकारच्या समारंभात मुख्यमंत्र्यांचे भाषण, शिष्यवृत्ती घोषणा, बक्षीस समारंभ, फिफा विश्वचषक ट्रॉफी सादरीकरण आणि संघाचे फोटो यांचा समावेश असेल.