मुंबई : स्वातंत्र्यपूर्व काळात १५ जुलै १९२६ रोजी मुंबईत पहिली बस अफगाण चर्च (कुलाबा) ते क्रॉफर्ड मार्केट (महात्मा फुले मंडई) या मार्गावर धावली होती. या बस सेवेला यंदा १०० वर्षे पूर्ण झाली आहेत. त्याचे औचित्य साधून मुंबईतील ‘बस स्टॅन्ड’ या ग्रुपने अनोखा उपक्रम बुधवारी साजरा केला. १९२६ रोजी धावलेल्या मार्गावरुन बसने प्रवास करत त्यानंतर केक कापून हा अनोखा बस दिन साजरा केला.
मुंबईत सुरू झालेल्या पहिल्या बससेवेच्या शताब्दी वर्षानिमित्त ‘बस स्टॅन्ड ग्रुप’चे ॲडमिन शुभम पालांडे आणि इतर बसप्रेमी एकत्र आले होते. त्यांनी अफगाण चर्च (कुलाबा) ते क्रॉफर्ड मार्केट या मुंबईतील पहिल्या बसमार्गाची आठवण जपण्यासाठी व ‘बस स्टन्ड’ ग्रुपच्या पुढाकाराने बस बुक करून त्याच मार्गावरुन प्रवास केला. आणि जुन्या आठवणींना उजाळा दिला.
शेवटी बेस्ट भवन येथील श्यामाप्रसाद मुखर्जी चौक येथे केक कापून शताब्दी साजरी केली. त्यानंतर सायंकाळनंतर याच बसने कोस्टल रोड, सिद्धीविनायक मंदिर, प्लाझा, दादर टीटी मार्गे वडाळा डेपोपर्यंत प्रवास करत या उपक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने बेस्ट प्रेमी उपस्थित होते.