मुंबई: कुख्यात डॉन दाऊद इब्राहीमच्या टोळीसाठी काम करणारा कुख्यात गुंड आसिफ मोहम्मद इक्बाल शेख ऊर्फ आसिफ दाडी याचा मुलगा समीर आसिफ मोहम्मद शेख याच्यावर मंगळवारी सायंकाळी डॉकयार्ड परिसरात अज्ञात व्यक्तीने गोळीबार केला. या गोळीबारात त्याच्या पायाला एक गोळी लागली असून त्याच्यावर जे. जे रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या गोळीबाराच्या घटनेने परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
मंगळवारी सायंकाळी सव्वासहा वाजता समीर हा डॉकयार्ड रोडने जात असताना त्याच्या दिशेने एका अज्ञाताने गोळ्या झाडल्या. मात्र प्रसंगावधान दाखविल्याने समीरच्या पायाला एक गोळी लागली. रक्तबंबाळ समीरला तातडीने जे. जे रुग्णालयात दाखल करण्यात आले.
हा गोळीबार कुणी व का केला हे स्पष्ट झालेले नाही. गोळीबारानंतर हल्लेखोर पळून गेला. समीर हा आसिफ मोहम्मद शेखचा मुलगा असून तो संघटित टोळीतील सराईत गुंड आहे. यापूर्वी त्याच्याविरुद्ध पोलिसांनी मोकातर्गंत कारवाई केली होती. विशेष म्हणजे, त्याचा बाप आसिफ मोहम्मदवरही अशाच प्रकारे गोळीबार झाला होता.