मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचत करण्याचे तसेच परदेशात फिरायला जाण्याचे एका वर्षासाठी टाळण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनानंतर विधिमंडळाच्या 12 आमदारांचा जपान दौरा रद्द झाला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हा निर्णय घेतला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिका - इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशवासीयांना काटकसरीचे आवाहन केले आहे. त्यावर राज्य सरकारकडून वेगवेगळे महत्त्वपूर्ण निर्णय घ्यायला सुरुवात केली आहे. मोदींनी आवाहन केल्यानंतर राज्यातील आमदारांनी त्याला प्रतिसाद दिला आहे. विधिमंडळ आमदारांचा प्रस्तावित जपान दौरा रद्द केला आहे.
जपानच्या दोन राज्यांतील गव्हर्नरकडून भेटीचे निमंत्रण आले होते. या दौऱ्यासाठी महाराष्ट्रातील 12 आमदारांचे शिष्टमंडळ जाणार होते.
तीन महिन्यांपूर्वी केले होते नियोजन
दरम्यान राज्याचे पर्यटन,खनिकर्म मंत्री शंभूराज देसाई यांनी आपल्या कुटुंबासोबत नियोजित असलेला युरोप दौराही रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. सुमारे तीन महिन्यांपूर्वी ही कौटुंबिक परदेश सहल ठरविण्यात आली होती.
या दौऱ्यात लंडन, पॅरिस आणि ॲम्स्टरडॅम या प्रमुख शहरांचा समावेश होता. कुटुंबासोबत सुट्टी आणि पर्यटनासाठी हा दौरा आखण्यात आला होता. मात्र आता त्यांनी आपला दौरा रद्द केल्याचे सांगितले आहे.
सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी सोमवारीच आपला कान्स चित्रपट महोत्सवासाठी आयोजित केलेला दौरा रद्द केल्याची घोषणा केली होती.