पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी हिच्या बरेली येथील घरावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे. हल्लेखोरांनी शुक्रवारी (दि.१२) घरावर तीन ते चार राऊंड फायर करून परिसरातून पाबोरा केला. या घटनेमुळे परिसरात घबराहट पसरली असून पोलिसांनी घराची सुरक्षा वाढविली आहे.
गोळीबारानंतर सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाली होती. यामध्ये गँगस्टर रोहित गोदारा याने या गोळीबाराची जबाबदारी घेतल्याची माहिती समोर आली आहे, या पोस्टमध्ये किती तथ्य आहे? याची बरेली पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.
गँगस्टर रोहित गोदारा (वीरेंद्र चरण) याने गोळीबाराची जबाबदारी घेतली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करताना त्याने म्हटले आहे की, दिशा पटानीची बहीण खुशबू पटानीच्या घरी झालेला गोळीबार आम्ही केला आहे. खूशबू पटानी हिने प्रेमानंद महाराज आणि अनिरुद्धाचार्य महाराज यांचा अपमान केला होता. तसेच सनातन धर्माचा अपमान करण्याचा प्रयत्न केला होता, त्यामुळे आम्ही गोळीबार केला. हा फक्त एक ट्रेलर होता. पुढच्या वेळी जर तिने किंवा इतर कोणी आमच्या धर्माबद्दल काही असभ्यता दाखवली तर त्यांच्या घरातील कोणीही जिवंत राहणार नाही.
रोहित गोदारा हा लॉरेन्स बिश्नोई गँगचा कुख्यात गुंड असून त्याच्यावर ३२ हून अधिक गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. तो राजस्थानमधील बिकानेर जिल्ह्यातल्या एका छोट्याशा गावातला रहिवासी आहे. तो १३ वर्षापासून गुन्हेगारी क्षेत्रात आहे.