Fine of Rs 56.68 crores imposed in Sambhajinagar for excessive sand mining
मुंबई : पुढारी वृत्तसेवा
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर-वैलवाडी येथील नदीपात्रातून नियमानुसार केवळ १ मीटर खोलीपर्यंत वाळू उत्खननाची परवानगी असताना, त्या ऐवजी अंदाजे १५ ते १८ फूट खोलीपर्यंत उत्खनन केल्याचे निष्पन्न झाले आहे.
त्यामुळे एकूण १८,४८९ ब्रास वाळूचे अतिरिक्त उत्खनन झाल्यामुळे ५६ कोटी ६८ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून संबंधित दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी दिली. विधान परिषदेत सदस्य विक्रम काळे यांनी याबाबत मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना ते बोलत होते.
बावनकुळे म्हणाले, छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी यांनी जलजीवन मिशन अंतर्गत गंगापूर व वैजापूर तालुक्यांतील ३७३ गावांसाठी पाणीपुरवठा योजनेसाठी मौजे सनव येथील वाळू घाटातून वाळू उत्खननास परवानगी दिली होती.
यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला ९,५४० ब्रास वाळू उत्खननाची मर्यादित मंजुरी देण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्षात एकूण २८,०२९ ब्रास वाळूचे उत्खनन करण्यात आल्याचे अहवालात स्पष्ट झाले आहे.
पर्यावरणीय मंजुरीनुसार नदीपात्रातील पाण्याचा स्वाभाविक वहन, स्वच्छता व जैवविविधतेच्या दृष्टीने १ मीटरपेक्षा अधिक खोलीने उत्खननास मनाई असून अशा प्रकारचे अतिरिक्त उत्खनन सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचाही भंग करणारे आहे. त्यामुळे सदर प्रकरणी फौजदारी कारवाईसुद्धा केली जाईल, असेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले.