FDA Pudhari
मुंबई

FDA Raid: राज्यभर एफडीएचा धडक कारवाईचा बडगा

पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधने, विनापरवाना औषधांसह ९० लाखांचा साठा जप्त

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: राज्यात बनावट, विनापरवाना आणि संशयित औषधे तसेच पाकिस्ताननिर्मित सौंदर्यप्रसाधनांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) धडक मोहीम उघडली आहे. तीन दिवसांत राज्यातील पाच शहरांत टाकलेल्या छाप्यांत तब्बल ९० लाख रुपयांहून अधिक किमतीचा संशयित साठा जप्त करण्यात आला.

यामध्ये पाकिस्ताननिर्मित सौंदर्यप्रसाधने, विनापरवाना आयुर्वेदिक औषधे, दिशाभूल करणारी उत्पादने आणि रुग्णालयांशी संलग्न मेडिकल स्टोअर्समधील नियमभंग उघडकीस आल्याने संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात आली आहे.

नांदेडमधील अफराह कलेक्शन येथे पाकिस्ताननिर्मित 'गोरी ब्युटी क्रीम', 'फेस फ्रेश ब्युटी क्रीम', 'उजोबा एक्स्ट्रा व्हाइट' आणि 'गोल्ड ग्लीम' या सौंदर्यप्रसाधनांचा ३९.७० लाख रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. खरेदीची बिले नसल्याने नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यातील कल्पतरू आयुर्वेद येथे परवान्याशिवाय भस्म व रस औषधांचे उत्पादन आणि विक्री सुरू असल्याचे आढळले. उत्पादनांवर आवश्यक तपशील नसल्याने ५०.३६ लाख रुपयांचा साठा जप्त करण्यात आला.

बीडमध्ये त्वचा गोरी करण्याचे दिशाभूल करणारे दावे करणाऱ्या 'मेरा रूप श्रृंगार क्रीम'चा ३६ हजार रुपयांचा साठा जप्त करण्यात आला.

सोलापूरच्या नोबल हॉस्पिटल संलग्न मेडिकल स्टोअरमध्ये प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधविक्री, शेड्यूल एच व एच १ औषधांच्या विक्रीतील नियमभंग, कालबाह्य औषधांचे अयोग्य व्यवस्थापन आणि कोल्ड साखळीतील औषधांच्या साठवणुकीत त्रुटी आढळल्याने 'स्टॉप ॲक्टिव्हिटी' आदेश देण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT