मुंबई : सिगारेटचा धूर तोंडावर सोडल्यावरुन झालेल्या वादातून एकाच कुटुंबातील तिघांवर चारजणांच्या टोळीने प्राणघातक हल्ला केल्याची घटना डोंगरी परिसरात घडली. या हल्ल्यात ओसामा अब्दुल कादर मदिया, त्याचा भाऊ फैजान अब्दुल कादर मदिया आणि काका गुलाम हुसैन मदिया हे तिघेही जखमी झाले होते. प्राथमिक औषधोपचारानंतर या तिघांनाही सोडून देण्यात आले.
याप्रकरणी डोंगरी पोलिसांनी हत्येचा प्रयत्नाच्या गुन्ह्यांत चौघांना अटक केली. अफजल अख्तर हुसैन मकरानी ऊर्फ मिन्ना, अन्वर हुसैन गुलाम हुसैन मकरानी ऊर्फ पप्पू मॅकनिक, उबेद रेहमान फारुखी आणि हसन अन्वर हुसैन मकरानी अशी या चौघांची नावे आहेत. अटकेनंतर या चौघांनाही स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही घटना रविवारी अडीच वाजता डोंगरीतील बिश्ती मोहल्ला, अख्तर मेंशन इमारत, बिल्डींग क्रमांक 66 जवळ घडली. याच परिसरातील तांडेल स्ट्रिट परिसरात ओसामा अब्दुल कादर मदिया हा राहतो. रविवारी रात्री ओसामा हा बिल्डींग क्रमांक 66 जवळ सिगारेट पित उभा होता. यावेळी सिगारेटचा धूर तेथून जाणाऱ्या अफजलच्या तोंडावरुन गेला होता. त्यामुळे अफजलने त्याला सिगारेटचा धूर तोंडावर का सोडला म्हणून जाब विचारुन त्याला जोरात ठोसा लगावला होता.
हा प्रकार ओसामाने त्याचा भाऊ फैजान मदिया, काका गुलाम हुसैन मदिया यांना सांगितला. त्यामुळे ते तिघेही अफजलला मारहाणीचा जाब विचारण्यासाठी गेले होते. यावेळी आरोपी अफजलने त्याच्या इतर सहकाऱ्यांच्या मदतीने ओसामा, त्याचा भाऊ फैजान आणि काका गुलाम यांना शिवीगाळ करुन लाथ्याबुक्क्यांनी बेदम मारहाण केली होती. आता तुम्हाला सोडत नाही असे बोलून त्यांनी त्यांच्यावर बेस बॉलच्या बॅटने प्राणघातक हल्ला केला होता. त्यात ते तिघेही जखमी झाले होते. हल्ल्यानंतर सर्व हल्लेखोर तेथून पळून गेले होते.
हल्ल्यात जखमी झालेल्या तिघांनाही स्थानिक रहिवाशांनी तातडीने जे. जे रुग्णालयात दाखल केले. तिथेच त्यांच्यावर प्राथमिक औषधोपचार करण्यात आले होते. या घटनेची माहिती मिळताच डोंगरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी ओसाम मदिया याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी चारही हल्लेखोरांविरुद्ध हत्येच्या प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच अफजल मकरानी, अन्वर मकरानी, उबेद फारुखी आणि हसन मकरानी या चौघांनाही काही तासांत अटक केली.