

मुंबई : मुंबईत दिवाळीमध्ये वायू प्रदूषणात विक्रमी वाढ झाली आहे. शहराची हवेची गुणवत्ता मोठ्या प्रमाणात खालावली असून सरासरी एक्यूआय 217 वर पोहोचला आहे, तर काही ठिकाणी तो गंभीर श्रेणीत आहे. त्यामुळे बहुतेक मुंबईकरांना श्वसनाचा त्रास, खोकला, डोळ्यांची जळजळ आणि थकवा जाणवू लागला आहे. विशेषतः लहान मुले, वृद्ध आणि दमा किंवा फुप्फुस विकार असलेल्या रुग्णांनी काळजी घेण्याचा सल्ला आरोग्य तज्ज्ञांनी दिला आहे.
सध्या दिवाळीनिमित्त सर्वत्रच फटाक्यांची आतषबाजी पाहायला मिळत आहे. मात्र याच फटाक्यांमुळे मुंबईला वायू प्रदूषणाचा विळखा बसला आहे. मुंबई शहरात सध्या धूरकट वातावरण पाहायला मिळत आहे. हवेची गुणवत्ता मोठ्या प्रमाणात खालावल्याने याचा थेट परिणाम दृश्यमानतेवर आणि नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. मुंबई शहरातील मुख्य महामार्गांवर दृश्यमानता लक्षणीयरीत्या कमी झाली आहे. त्यामुळे वाहनधारकांना कठीण परिस्थितीचा सामना करावा लागत आहे.
हाजी अली दर्गा परिसर घनदाट धुरक्याने वेढला जात आहे. दादर चौपाटी, बांद्रा-कुर्ला संकुल आणि पवई परिसरातही दृष्यमानता कमी झाली आहे. शहरातील विविध भागांमध्ये हवामान निर्देशांक चिंताजनक पातळीवर आहे. म्हणजेच नागरिकांच्या आरोग्यास घातक कॅटेगरीमध्ये आहे. याचा अर्थ शहरातील बहुतांश लोक दूषित हवेत श्वास घेत आहेत. दिवाळीच्या पहिल्या दिवशीच मुंबईकरांची पहाट शुभ्र धुक्याऐवजी धुरकट धुराने झाली. या दिवशी सरासरी एक्यूआय 187 इतका होता, तो वाढून सध्या 217 वर गेला आहे. विशेष म्हणजे कुलाबा येथील हवामान विभागाच्या केंद्रावर हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक तब्बल 341 इतका नोंदवला गेला.
विविध आजारांचा त्रास
हवेची गुणवत्ता खालावल्यामुळे याचा थेट परिणाम आरोग्यावर होत आहे. सर्दी, खोकला, सायंकाळी खोकल्यात वाढ होणे, नाक गळणे, घसा दुखणे इत्यादी आजारांच्या रुग्णांमध्ये मागील काही दिवसांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. विशेष म्हणजे ज्यांना दम्याचा त्रास आहे, त्यांना घशामध्ये खवखव किंवा घशाचा त्रास अधिक जाणवू लागला आहे.
शहराच्या विविध भागांतील एक्यूआय
कुलाबा 341
भायखळा 262
बी.के.सी. 242
पवई 239
कांदिवली पश्चिम 229
चेंबूर 208
माईंडस्पेस मालाड पश्चिम 204