मुंबई : नमिता धुरी
प्रभादेवी पूलबाधितांसाठी म्हाडाकडून 119 घरांची यादी एमएमआरडीएला देण्यात आली होती. त्यापैकी 83 घरांमध्ये एमएमआरडीएने स्वारस्य दाखवले आहे. या घरांच्या मोबदल्यात एमएमआरडीएकडून म्हाडाला 100 कोटी मिळणार आहेत.
अटल सेतूवरून थेट वांद्रे-वरळी सागरी सेतूला जोडणाऱ्या वरळी-शिवडी उन्नत जोडरस्त्यासाठी प्रभादेवी रेल्वे स्थानकावरील पूल तोडण्यात येणार आहे. यात 19 इमारती बाधित होणार होत्या. दरम्यानच्या काळात पुलाच्या आरेखनात बदल होऊन 17 इमारती वाचवण्यात आल्या. हाजी नुरानी आणि लक्ष्मी निवास या दोनच इमारती आता बाधित होणार आहेत. त्यांतील 83 रहिवाशांना कुर्ला येथे कायमस्वरुपी घरे देण्यात येणार होती; मात्र जवळपासच्या परिसरातच घरे उपलब्ध व्हावीत, अशी रहिवाशांची मागणी आहे.
म्हाडाच्या उपकरप्राप्त इमारतींच्या पुनर्विकासातून उपलब्ध झालेली अतिरिक्त घरे प्रभादेवी पूल परिसरात आहेत. ही घरे बाधित इमारतींतील रहिवाशांना दिली जाणार आहेत. अशा 119 घरांची यादी म्हाडाने एमएमआरडीएला दिली होती. त्यापैकी 83 घरांमध्ये एमएमआरडीएने स्वारस्य दाखवले आहे. ही घरे प्रकल्पबाधितांना दिली जातील व त्याच्या मोबदल्यात एमएमआरडीएकडून म्हाडाला 100 कोटी रुपये मिळतील.