Fake Visa Racket Pudahri
मुंबई

Fake Visa Racket: बनावट व्हिसा-तिकिटांच्या व्हॉट्सॲप रॅकेटचा पर्दाफाश; सात वर्षांपासून फरार आरोपीला अटक

बनावट व्हिसा आणि विमान तिकिटांच्या आधारे महिलांना दुबईसह परदेशात पाठविणाऱ्या कथित रॅकेटप्रकरणी योगानंद पुजारीला ७ वर्षांनी मुंबई गुन्हे शाखेने अटक केली.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: बनावट व्हिसा आणि विमान तिकिटांच्या आधारे महिलांना दुबईसह परदेशात पाठविणाऱ्या कथित रॅकेटप्रकरणी सात वर्षांपासून फरार असलेल्या योगानंद पुजारी (४२) याला मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट-८ने अटक केली.

मूळचा कर्नाटकातील असलेला पुजारी २०१९ पासून पोलिसांना गुंगारा देत होता. त्याच्याविरोधात लूकआऊट सर्क्युलर जारी करण्यात आले होते. रविवारी तो भारतात दाखल झाल्याची माहिती मिळताच गुन्हे शाखेने त्याला ताब्यात घेतले. न्यायालयाने पुजारीला पोलिस कोठडी सुनावली आहे.

ऑगस्ट २०१९मध्ये मुंबई विमानतळावर सिमरन तुलस्यान ही महिला दुबईला जाण्याच्या तयारीत होती. इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी तिच्या कागदपत्रांची तपासणी केली असता दुबईहून मुंबईला परतण्यासाठी तिच्याकडे असलेले विमान तिकीट संबंधित विमान कंपनीच्या आरक्षण प्रणालीमध्ये आढळून आले नाही.

त्यामुळे तिकीट बनावट असल्याचा संशय निर्माण झाला. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला असता बनावट व्हिसा आणि विमान तिकिटांच्या रॅकेटचा धागा समोर आला.

या प्रकरणात पोलिसांनी यापूर्वी मोहम्मद फिरोज राशिद सय्यद ऊर्फ ‘ॲश खान’ याला अटक केली होती. त्याची चौकशी करताना योगानंद पुजारीचा सहभाग समोर आल्याचा पोलिसांचा दावा आहे. पुजारी बनावट व्हिसा व विमान तिकिटे तयार करून ती व्हॉट्सॲपद्वारे संबंधित व्यक्तींना पाठवत असल्याचा आरोप आहे.

पुजारीने आणखी काही महिलांना परदेशात पाठविण्यास मदत केली होती का, याचा तपास गुन्हे शाखा करत आहे. न्यायालयीन रिमांड कागदपत्रांमध्ये किशी, मोना, ममता आणि श्रेया या चार महिलांची नावे नमूद असल्याचे समोर आले आहे.

प्रकरण उघडकीस आल्यानंतर पुजारी फरार झाला. पोलिसांकडून त्याचा शोध सुरू असतानाच त्याच्याविरोधात लूकआऊट सर्क्युलर जारी करण्यात आले. सुमारे सात वर्षे तो पोलिसांच्या हाती लागला नव्हता. रविवारी तो भारतात परतल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर युनिट-८च्या पथकाने त्याला अटक केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT