मुंबई ः राज्यातील उच्च शिक्षणातील विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी होणाऱ्या सामायिक प्रवेश परीक्षांचे (सीईटी) नोंदणी शुल्क वाढवण्याचा प्रस्ताव राज्य सीईटी कक्षाने तयार करून उच्च व तंत्रशिक्षण मंडळाकडे पाठवला आहे. शासनस्तरावरील मंजुरीनंतर यावर लवकरच निर्णय होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. प्रस्तावानुसार नोंदणी शुल्कात किमान 150 ते कमाल 250 रुपयांपर्यंत वाढ होण्याची चिन्हे आहेत.
सीईटी कक्षामार्फत 19 प्रवेश परीक्षांद्वारे अभियांत्रिकी, फार्मसी, नर्सिंग, बीएड, हॉटेल मॅनेजमेंट अशा 72 अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया घेतली जाते. काही परीक्षा प्रत्यक्ष लेखी स्वरूपात, तर काही संगणकीय पद्धतीने राज्यभरातील विविध केंद्रांवर घेतल्या जातात. 2026-27 शैक्षणिक वर्षातील सीईटीची सुरुवात 24 मार्चपासून एमपी.एड. अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा होणार आहे. तर यानंतर अभियंत्रिकी प्रवेशासाठी एमएचसीईटीच्या पीसीएम गटाची पहिली परीक्षा 11 ते 19 एप्रिल, तर पीसीबी गटाची पहिली परीक्षा 21 ते 26 एप्रिल या कालावधीत होणार आहे. विद्यार्थ्यांना दिलेल्या अतिरिक्त संधीअंतर्गत पीसीएमच्या दुसऱ्या फेरीच्या परीक्षा 14 ते 17 मे, तर पीसीबीच्या दुसऱ्या फेरीच्या परीक्षा 10 आणि 11 मे रोजी आयोजित केल्या जाणार आहेत.
परीक्षा केंद्रांच्या सुविधा, मनुष्यबळ, संगणकीय प्रणाली, तसेच राज्यभर उभारण्यात येणाऱ्या विद्यार्थी सहाय्यता केंद्रासाठी वाढलेल्या खर्चाच्या पार्श्वभूमीवर शुल्कवाढ आवश्यक झाल्याचे उच्च व तंत्रशिक्षण विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. विद्यार्थ्यांवर अनाठायी भार न पडता व्यवस्थेचा खर्च भागवण्यासाठी मर्यादित वाढ करत जास्तीत जास्त 250 रुपये प्रस्तावित केली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.