मुंबई : निवडणूक कामासाठी 2 हजार 865 वाहने तैनात असून या वाहनांवरही प्रशासन बारीक लक्ष ठेवणार आहे. यासाठी भौगोलिक कुंपण (जिओ फेन्सिंग) प्रणाली विकसीत केली असून महापालिका मुख्यालयात नियंत्रण कक्ष उभारण्यात आला आहे.
अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी सांगितले की, मतदान संयंत्रे, मतदान प्रक्रियेतील अधिकारी व कर्मचारी यांची ने - आण करण्यासाठी 2 हजार 865 वाहनांची व्यवस्था केली आहे. यामध्ये बेस्टच्या 1 हजार 23 बसेस, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या 101 बसेस, खासगी 1 हजार 160 बसेस आणि 581 टॅक्सींचा समावेश आहे.
या वाहनांचे थेट स्थान निरीक्षण (लाईव्ह ट्रॅकिंग), विशिष्ट कालावधीत मार्गक्रमणाचा इतिहास (पास्ट हिस्टरी) आणि भौगोलिक कुंपण इशारा (जिओ फेन्सिंग अलर्ट) या बाबींसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व वाहनांवर ट्रॅकिंग सिस्टम बसविण्यात आली असून ते नियंत्रण कक्षाशी जोडलेले आहे.
त्यामुळे, कोणते वाहन कोणत्या मार्गाने प्रवास करत आहे किंवा कोणकोणत्या ठिकाणी गेले, याविषयी इत्थंभूत माहिती उपलब्ध होऊ शकते. प्रथमच वाहनांचे थेट स्थान निरीक्षण (लाईव्ह ट्रॅकिंग) जाणून घेण्यासाठी प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यकक्षाच्या ऑनलाईन नकाशावर भौगोलिक कुंपण (जिओ फेन्सिंग) प्रणाली पुरवण्यात आली आहे.
नेमण्यात आलेली वाहने संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यकक्षेबाहेर गेल्यास तत्काळ नियंत्रण कक्षाला इशारा (अलर्ट) मिळेल. त्यावरुन, संबंधित वाहनाची यथास्थिती जाणून घेता येईल. ही संपूर्ण प्रक्रिया राबविण्यासाठी नियंत्रण कक्षात घनकचरा व्यवस्थापन विभागाचे 3 अभियंता आणि 3 प्रचालक (ऑपरेटर) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.