

बदलापूर : बदलापुरातील भाजपचे माजी शहराध्यक्ष जयवंत मुठे आणि भारतीय जनता युवा मोर्चाचे शहराध्यक्ष नयन मुठे यांच्या कार्यालयात घूसून मारहाण करत खुर्च्यांनी तोडफोड केल्याची गंभीर घटना मंगळवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास बदलापूर पूर्वेकडील आगाराळी या ठिकाणी घडली.
जयवंत मुठे आणि नयन मुठे हे आपल्या कार्यालयात बसलेले असतानाच तीन अज्ञात व्यक्ती कार्यालयात दाखल झाल्या आणि त्यांनी अचानकपणे कार्यालयातील साहित्याची तोडफोड करण्यास सुरुवात केली. काही क्षणांतच कार्यालयात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.
कुळगांव-बदलापूर परिसरात तणाव निर्माण करणारी मारहाणीची घटना घडली असून याप्रकरणी नयन मुठे यांच्या तक्रारीवरून सचिन पवार, कौस्तुभ शेट्टी व स्वप्नील पै यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बदलापूर पूर्व आगरआळी येथील कार्यालयात बसून असताना आरोपींनी संगनमत करून मुठे यांच्या कार्यालयात जबरदस्तीने प्रवेश केला. यावेळी सचिन पवार याने ‘आज तुम्हाला सोडणार नाही’ अशी धमकी देत शिवीगाळ केली, तर कौस्तुभ शेट्टी याने ‘मी इथला भाई आहे, मध्ये कोणी आला तर सगळ्यांना कापून टाकीन’ अशी दहशत निर्माण करणारी धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. कार्यालयाबाहेर स्वप्नील पै याने, विलास मुठे यांना धक्काबुक्की केली. त्यानंतर कौस्तुभ शेट्टी याने नयन मुठे याला पकडून ठेवत, सचिन पवार याने लोखंडी खुर्चीने डोक्यात व पायावर मारहाण केली. तसेच जयवंत मुठे यांच्या उजव्या हातावर लोखंडी खुर्ची मारून गंभीर दुखापत केल्याचे तक्रारीत नमूद आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
नवी मुंबई : प्रचाराची सांगता होताच नवी मुंबईत हाणामारीचे सत्र सुरू झाले आहे. मंगळवारी कोपरखैरणे, घणसोलीत घटना घडल्यानंतर बुधवारी ऐरोलीत शिवसेनेचे उमेदवार व माजी नगरसेवक एम.के.मढवी व त्यांच्या कुटुंबीयांनी ऐरोलीत सेक्टर 16 मधील एका मंडळाच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली. हा प्रकार सीसीटिव्हीमध्ये कैद झाला असून पोलिसांनी मढवी कुटुंबीयांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
मंगळवारी पैसे वाटपावरून कोपरखैरणेत शिवसेना उमेदवाराच्या पुतण्याला मारहाण झाली होती. त्यानंतर घणसोलीत शिवसेना आणि भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये वाद झाला होता.
बुधवारी ऐरोलीतील माजी नगरसेवक एम.के.मढवी, माजी नगरसेविका विनया मढवी आणि करण मढवी यांनी ऐरोली सेक्टर 16 येथील एका मंडळाच्या ठिकाणी जाऊन त्या मंडळातील युवकांना मारहाण केली. याची तक्रार रबाळे पोलिसांत केल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक व अधिकारी मढवी यांना विचारपूस करण्याकरिता गेले असता पोलिसांबरोबरही त्यांनी हुज्जत घातली. त्यामुळे तिघांनाही रबाळे पोलिसांनी ताब्यात घेतले.
ऐरोली विधानसभा मतदारसंघात कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली, दिघा हे विभाग अतिसंवेदनशील ओळखले जातात. तर बेलापूर मतदारसंघात तुर्भे, कोपरी, महापे, वाशी, नेरुळ मधील काही प्रभाग हे संवेदनशील मध्ये मोडतात. या ठिकाणी पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावला आहे.