CM Devendra Fadnavis pudhari photo
मुंबई

Kharif Season Rain Forecast : खरीप हंगामावर ‌‘अल्‌‍ निनो‌’चे सावट

खत तुटवड्याचे संकट; राज्यात सरासरी 88 टक्के पावसाचा अंदाज : मुख्यमंत्री फडणवीस

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : राज्यात यंदाच्या खरीप हंगामावर ‌‘अल निनो‌’चे मोठे सावट असून, त्यामुळे राज्यात सरासरी 88 टक्के पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तसेच, मध्य पूर्वेतील युद्धामुळे रासायनिक खतांचा तुटवडा होऊ शकतो. पश्चिम विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अपुऱ्या पावसाचा फटका बसू शकतो, अशी भीती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी येथे व्यक्त केली.

यंदाच्या खरीप हंगामात कमी पाऊस आणि खत व्यवस्थापन ही दोन मोठी आव्हाने असतील. मात्र, प्रशासन, कृषी विद्यापीठे आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने या संकटांचा सामना करण्यासाठी सरकार सज्ज असल्याची ग्वाही फडणवीस यांनी यावेळी दिली.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी सह्याद्री अतिथीगृह येथे राज्यस्तरीय खरीप हंगाम आढावा बैठक पार पडली. या बैठकीनंतर फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत बोलताना खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी राज्य सरकारने केलेल्या तयारीची माहिती दिली.

152 लाख हेक्टरवर लागवड

यंदाच्या खरीप हंगामात 152 लाख हेक्टरवर लागवड होण्याचा अंदाज आहे. जूननंतर जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पावसाचे प्रमाण क्रमाक्रमाने कमी होत जाण्याचा अंदाज आहे. तसेच, दोन पावसाच्या दरम्यान मोठे अंतर राहू शकते. त्यामुळे पिकांवर ताण येऊ शकतो. ही परिस्थिती लक्षात घेऊन जलयुक्त शिवारची कामे वेगाने पूर्ण करा, असे फडणवीस म्हणाले.

2015 मध्ये अल निनोच्या प्रभावामुळे मराठवाड्यात जवळपास 39 टक्के पावसाची तूट होती. तेव्हा जिल्हानिहाय आपत्कालीन नियोजन तयार ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दुष्काळाचा ताण सहन करू शकणारी बियाणे, हवामान सल्ला आणि कृषी विद्यापीठांच्या मदतीने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याबाबत कृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंना सूचना दिल्या आहेत. हवामान विभागाच्या वेदर ॲडव्हायजरीच्या आधारे पीक नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहिती देण्यात आली.

28 लाख टन बियाणे उपलब्ध

राज्याला 20.16 लाख मेट्रिक टन बियाणांची आवश्यकता आहे. मात्र, आपल्याकडे 28 लाख मेट्रिक टन बियाणे उपलब्ध आहे. सोयाबीन, कापूस, मका, भात, तूर आणि बाजरीच्या बियाणांचा पुरेसा साठा आहे. बनावट बियाणांमुळे फसवणूक टाळण्यासाठी साथी पोर्टलवर नोंदणीकृत बियाणांचीच खरेदी शेतकऱ्यांनी करावी, असे आवाहन फडणवीस यांनी केले.

खतांची साठेबाजी रोखणार

सध्या राज्यात खतांचा सुमारे 25 टक्के जुना साठा उपलब्ध असून, नवीन साठाही येणार आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे खतांचा ताण निर्माण होऊ शकतो. त्यामुळे खतांचा चुकीचा वापर, साठेबाजी आणि डायव्हर्जन रोखण्यासाठी जिल्हास्तरावर काटेकोर नियोजन करणे आवश्यक आहे. खतांच्या संपूर्ण साखळीवर देखरेख ठेवू, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.

‌‘महाविस्तार 2.0‌’ ॲपचे अनावरण

कृषी विभागाच्या ‌‘महाविस्तार 2.0‌’ या ॲपचे अनावरण करण्यात आले. या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या भाषेत हवामान, पीक व्यवस्थापन, कीड नियंत्रण आणि बाजारभावाची माहिती मिळणार आहे. एआयआधारित कॉलिंग सुविधेद्वारे शेतकरी थेट संवाद साधू शकणार आहेत. ‌‘क्रॉप्स ॲप‌’च्या माध्यमातून पिकाचा फोटो अपलोड करताच पिकाची स्थिती, रोग-कीड आणि आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्यांची माहिती मिळणार आहे. तसेच, पीक विमा प्रक्रियेत पारदर्शकता येण्यासाठी डिजिटल क्रॉप सर्व्हे प्रणाली तसेच सेंट्रल बँक डिजिटल करन्सी प्रणालीही सुरू करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT