Eknath Shinde on Uddhav Thackeray
नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : आम्ही सगळ्या कायदेशीर बाजू तपासून निर्णय घेतला आहे. कुठलेही ऑपरेशन आम्ही फुलप्रूफ करतो. आमच्याकडे आलेल्या खासदारांनी लोकसभा अध्यक्षांची भेट घेऊन सर्व प्रक्रिया पूर्ण केली आहे. लोकसभा अध्यक्षांचा निर्णय लवकरच जाहीर होईल, असे प्रत्युत्तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना दिले.आता ते रामरक्षेची गोष्ट करत आहेत. त्यांनी आधी रामरक्षा पाठांतर करावी, त्यांना आता समजले आहे की, 'जो नाही रामाचा, तो नाही कामाचा.' हनुमान चालीसा म्हणणाऱ्यांना तुरुंगात टाकणारे आज राम आणि रामरक्षेची भाषा करत आहेत. जनतेला हे सर्व चांगलेच माहिती आहे, असाही टोला त्यांनी उद्धव ठाकरेंचे नाव न घेता लगावला.
शिवसेना ठाकरे गटातील ६ खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर बुधवारी पक्षाचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, संसदीय नेते डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेला खासदार श्रीकांत शिंदे, नवे ६ खासदार उपस्थित होते.
यावेळी शिंदे म्हणाले की, खासदारांचा प्रवेश पूर्णपणे कायदेशीर प्रक्रियेनुसार आहे. विरोधकांकडे कोणतेही तथ्य नाही. आम्ही कोणतेही पाऊल उचलताना सर्व कायदेशीर बाबींची सखोल पडताळणी करतो. ज्यांच्या स्वतःच्या आघाडीत रोज मतभेद आणि गोंधळ सुरू आहे, ते आमच्याबद्दल बोलत आहेत. त्यांनी आधी स्वतःच्या आघाडीची चिंता करावी, असा टोलाही त्यांनी लगावला. ज्यांच्या आघाडीत गडबड आहे ते आमच्याबद्दल बोलतात, असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी विरोधकांच्या इंडिया आघाडीलाही उत्तर दिले. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी ही सदिच्छा भेट होती, आमच्या सर्व खासदारांना केंद्र सरकार सर्वतोपरी सहकार्य करणार आहे, अशी ग्वाही अमित शहा यांनी यावेळी सांगितले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत झालेल्या बैठकीबाबत बोलताना शिंदे म्हणाले की, अमित शहा यांच्यासोबत ही सदिच्छा भेट होती. शिवसेनेत दाखल झालेल्या सहा खासदारांच्या मतदारसंघांतील विकासकामे, केंद्र सरकारच्या विविध योजना, प्रलंबित प्रकल्प आणि आवश्यक निधी यावर सकारात्मक चर्चा झाली. मराठवाडा सिंचन प्रकल्प, रेल्वे आणि रस्ते, पंतप्रधान आवास योजना, नगर विकास विभाग संबंधी प्रकल्प यांसह प्रत्येक खासदारांच्या मतदारसंघातील विविध विषयांवर चर्चा झाली. दरम्यान, अमित शाह यांच्यासोबत केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराबाबत आणि राजकीय कुठलीही चर्चा झाली नाही, असेही ते म्हणाले.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात महिला आरक्षण विधेयक आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयक आल्यास ते नक्कीच मंजूर होईल. संसदेत महिलांना आरक्षण देण्याची भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मांडली. तसे विधेयक आणले मात्र विरोधकांनी त्याला सहकार्य केले नाही त्याबद्दल चुकीच्या गोष्टी पसरवल्या. अमित शहा यांनी या विधेयकाबाबत पूर्वीच सर्व गोष्टी स्पष्ट केल्या होत्या. मतदारसंघांची लोकसंख्या २५ लाखांपर्यंत गेली आहे. त्यामुळे विकास कामांना गती मिळत नाही. मतदारसंघ पुनर्रचनेमुळे मतदारसंघ लहान होणार आहेत. तसेच इतरही महत्त्वाची विधेयके सरकारद्वारे आणले जातील त्याला एनडीए म्हणून आमचे पूर्ण समर्थन आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह सरकारची प्रतिमा स्वच्छ आहे, असेही ते म्हणाले. विरोधकांनी या विधेयकांना पारित करण्यात ज्या अडचणी निर्माण केल्या त्यामुळे त्यांना पश्चिम बंगालमध्ये त्याचे उत्तर मिळाले आहे. त्यांना आता तरी त्याचे महत्त्व कळेल, असा टोलाही लगावला.
संजय राऊत यांच्या टीकेवर प्रश्न विचारला असता त्यांच्याबद्दल आमचे प्रवक्ते बोलतील. ते कोणाकडून पगार घेतात आणि कुठे बोलतात हे माहीत आहे. कोणाची चाकरी आणि कोणाची नोकरी करतात हे सर्वांना माहीत आहे. हिंदुत्वाशी कोणी बेइमानी केली आहे हे राज्यातील जनतेने पाहिले आहे आणि त्यांना त्यांची जागा दाखवली आहे. आम्ही त्यांची भाषा वापरणार नाही मात्र आम्हाला ज्यांनी ४ वर्ष शिव्या दिल्या ते कुठे आहेत हे पहा, असेही ते म्हणाले.
जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. याबाबत बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांना कोणीही भेटण्यात काहीही गैर नाही. सांगलीतील एक विषय घेऊन ते गेले होते. जयंत पाटील माझ्याकडेही भेटायला आले होते. काही कामानिमित्त प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे देखील वर्षावर होते. काही दिवसांपूर्वी शरद पवार देखील माझ्या विधान भावनातील दालनात आले होते. एकमेकांना भेटण्याची, ते आपल्याकडे आले तर स्वागत करण्याची महाराष्ट्राची संस्कृती आहे ती आम्ही जपतो, असेही ते म्हणाले. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा एनडीएमध्ये प्रवेश होणार का याबाबत विचारले असता शिंदे म्हणाले की, एनडीए चा निर्णय घेणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह आहेत. कोणाला प्रवेश द्यायचा याचा निर्णय ते घेतील. मात्र शरद पवार यांच्या कोणत्याही खासदारांनी आम्हाला संपर्क साधलेला नाही आणि आम्ही देखील कोणाला संपर्क साधलेला नाही.
वारीदरम्यान मंत्री शंभूराज देसाई यांनी एकनाथ शिंदे यांनी पुन्हा राज्याचे नेतृत्व करावे, असे विधान केले होते. यावर बोलताना शिंदे म्हणाले की, आता मुख्यमंत्रीपदाची खुर्ची रिकामी नाही. प्रत्येक कार्यकर्त्याला वाटते की आपले नेते मुख्यमंत्री व्हावेत. मी मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री होते. तेव्हा भाजपच्याही कार्यकर्त्यांना वाटत होते की, देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री व्हावे. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावना स्वाभाविक आहेत. आमची लढाई ही खुर्चीची नाही तर विचारांची आहे. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे घेऊन जात आहोत, असेही ते म्हणाले.
शेतकऱ्यांविषयी बोलताना शिंदे म्हणाले की, सरकारने कर्जमाफीची घोषणा पूर्ण केली असून यंदाच्या अर्थसंकल्पातही शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. पन्नास हजार रुपयांच्या अटीतील अडथळे दूर करण्यात आले आहेत. सरकारच्या तिजोरीवर पहिला अधिकार बळीराजाचा आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी जे काही करावे लागेल ते आम्ही करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.