Political Controversy
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील तीन शासकीय बैठका आणि स्वतःच्या कार्यक्रम पत्रिकेतील सात बैठकांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बुधवारी गैरहजर राहिले. शिवसेना आणि भाजपमध्ये आगामी पालिका निवडणुकांच्या जागावाटपावरून सुरू असलेली ओढाताण आणि निधी वितरणावरून अजित पवारांवारील रोष, यामुळे महायुतीत पुन्हा नाराजीनाट्य रंगू लागले आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी शासकीय बैठकांकडे पाठ फिरविल्याची चर्चा आहे.
सह्याद्री अतिथीगृहात बुधवारी विविध विभागांच्या महत्वाच्या बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. यात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण बैठक. विधिविधान शाखेच्या बोधचिन्हाचे अनावरण आणि विधिविधान शाखेच्या कामकाजाशी संबंधित 4 पुस्तकांचे प्रकाशन तसेच वृक्ष लागवड मोहीमेसंदर्भात बैठकीचा समावेश होता. मात्र, या तिन्ही बैठकांकडे शिंदे यांनी पाठ फिरवली.
त्यांच्या अनुपस्थितीच मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री गिरीश महाजन यांच्यासह संबंधित मंत्री, अधिकार्यांच्या उपस्थितीत या बैठका पार पडल्या. विशेष म्हणजे आपत्ती व्यवस्थापन सारख्या विषयाच्या बैठकीलाही शिंदे गैरहजर राहिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
रोजगार हमी योजना विभाग आढावा, फलोत्पादन विभाग आढावा बैठक, आरोग्य विभाग आढावा, आदिवासी, नक्षलग्रस्त जिल्ह्यात कार्यरत भरारीपथक मानसेवी वैद्यकीय अधिकारी यांच्या सेवेबाबत बैठक नियोजित करण्यात आली होती. शिंदे हे शासकीय बैठकांना गैरहजर राहिल्याने नाराजीची चर्चा सुरू आहे.