

देवदैठण: श्रीगोंदा तालुक्यातील पश्चिमेकडील टोकाला असणार्या येळपणे गटात माजी आ. राहुल जगताप यांच्या पक्षप्रवेशाच्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला असून, गटातील कार्यकर्ते वा समर्थकांच्या घड्याळाची टिकटिक सुरू झाली आहे.
नुकत्याच विधानसभा निवडणुकीत झालेल्या बहुरंगी लढतीतील मत विभाजनाचा फायदा विक्रम पाचपुतेंनी घेतला अन् विजय मिळवत आमदार झाले. पराभवानंतर जगताप यांच्यासह इतर नेतेही सायलेंट मोडवर गेल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांतही उदासीनता आली. (Latest Ahilyanagar News)
विधानसभेत अपक्ष उमेदवारी केलेले माजी आ. जगताप आता कुठल्या पक्षात जाणार यावरील चर्चेला तालुक्यासह येळपणे गटात उधाण आले. कारखान्याची अडचण सुटण्यासाठी सत्ताधारी पक्षातच प्रवेश करावा लागणार. मात्र, जगताप यांचे वरिष्ठ सर्वपक्षीय नेत्यांबरोबर चांगले संबंध असल्याने ते आता कुठल्या पक्षात जाताहेत यावरील चर्चेने राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले होते.
माजी आ. राहुल जगताप व नागवडे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी नुकताच सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. जगताप-नागवडे मनोमिलनाची बातमी सोशल मीडियावर व्हायरल होताच येळपणे गटातील कार्यकर्त्यांत उत्साह संचारला. जगतापांच्या पक्ष प्रवेशाच्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला असून, गटातील कार्यकर्ते वा समर्थकांच्या घड्याळाची टिकटिक आता सुरू झाली आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अतुल लोखंडे, ‘कुकडी’चे उपाध्यक्ष विवेक पवार, तालुका खरेदी-विक्री संघाचे संचालक संदीप सोनलकर व मच्छिंद्र वाळके, मीना देवीकर व गीतांजली पाडळे, सरपंच मोहन आढाव, सरपंच संजय इथापे, विलास दिवटे, अॅड. निवृत्ती वाखारे, सुभाष राक्षे, अशोक वाखारे, विजय शिर्के, सोमनाथ वाखारे, श्रीपाद कवाष्टे, प्रवीण आढाव, अभिजीत ढवळे, दिलीप थेऊरकर, किशोर घेगडे, संतोष नरोडे, सुधीर घेगडे, बापू कातोरे, मोहन दळवी, लक्ष्मण देविकर, गणेश बोबडे, संजय रिकामे, दत्तात्रय धानगुडे, निखिल मगर आदींसह कार्यकर्त्यांनी माजी आ. जगताप यांनी घेतलेला निर्णय योग्यच असून, आता थांबायचं नाय म्हणत आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे सांगितले.