मुंबई : पुण्यातील एका कार्यक्रमात शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जय हिंद, जय महाराष्ट्रसोबत ‘जय गुजरात’ म्हटल्यानंतर उबाठा शिवसेनेकडून होणार्या टीकेला उद्धव ठाकरेंचा जय गुजरात असा नारा देणारा जुना व्हिडिओ पोस्ट करून प्रत्युत्तर दिले आहे. तसेच गुजरात हा काही पाकिस्तान नाही, पुण्यातील गुजराती भाषिकांच्या कार्यक्रमात गेल्याने जय गुजरात म्हटले तर त्यात एवढे आक्षेप घेण्यासारखे काय? असा सवाल शिंदेंनी विरोधकांना विचारला.
मतांसाठी आधी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी गुजराती मतदारांना जवळ करण्याचा आटोकाट प्रयत्न केला होता. त्यासाठी कधी ‘जिलेबी ने फापडा, उद्धव भाई आपडा’, अशा घोषणा दिल्या होत्या. तर आदित्य ठाकरे यांनीही ‘केम छो वरळी’ अशी घोषणा दिली होती. त्यामुळे उद्धव ठाकरे ‘एकतर हे भोंदू आहेत नाही तर संधीसाधू’ असा पलटवार शिवसेनेच्या अधिकृत सोशल मिडीया खात्यावरून करण्यात आली. त्यानंतर संध्याकाळी पुण्यातून परतल्यानंतर एकनाथ शिंदेंनी आपली भूमिका स्पष्ट केली.
पुण्यातील गुजराती बांधवांनी एक संकुल उभारले आहे. त्याचे लोकार्पण करण्यात आले. माझ्या भाषणाच्या शेवटी मी जय हिंद, जय महाराष्ट्र असे म्हणलो. जय हिंद म्हणजे देशाच्या अभिमान, जय महाराष्ट्र म्हणजे राज्याचा अभिमान. आज पुण्यातील गुजराती लोकांसाठी कार्यक्रम होता. गुजराती लोकांनी महाराष्ट्राला कर्मभुमी मानली आहे, त्यामुळे मी शेवटी जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात असे म्हणलो तर त्यात वावगे काय? असा सवाल एकनाथ शिंदे यांनी केला.
यानंतर पुढे बोलताना एकनाथ शिंदे यांनी ‘उद्धव ठाकरेंचा एक जुना व्हिडिओ दाखवला, ज्यात उद्धव ठाकरे हे देखील जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात असे म्हणत आहेत. तसेच शिंदेंनी आणखी एक पत्र दाखवले, ज्यात मुंबई मा जलेबी आणि फाफडा, उद्धव ठाकरे आपडा असे लिहिलेले आहे. त्याचबरोबर आदित्य ठाकरेंचा एक पोस्टर दाखवत त्यावर केम छो वरळी असे लिहिलेले आहे.
हे व्हिडीओ आणि पत्र दाखवत शिंदे म्हणाले, जे आमच्यावर बोलत आहेत, त्यांनी आरसा पहावा. मराठीबद्दल आम्हाला शिकवण्याची गरज नाही. आता येणार्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन राजकारण केले जात आहे. गुजरात पाकिस्तानमध्ये आहे का? बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंच्या विचारांची ही शिवसेना आहे. त्यामुळे मी आधी जय हिंद म्हणालो, जय महाराष्ट्र म्हणालो. आमची महाराष्ट्राच्या मातीशी घट्ट नाळ जुळली आहे. जय गुजरात म्हटल्याने काहीतरी मोठी चूक केली असे होत नाही, असेही शिंदे म्हणाले.