निवडणुकीबाबत निर्णय घेण्याचा अधिकार प्रत्येकाला: एकनाथ शिंदे  File Photo
मुंबई

Eknath Shinde | निवडणुकीबाबत निर्णय घेण्याचा अधिकार प्रत्येकाला: एकनाथ शिंदे

अन्य महापालिकेत स्थानिक परिस्थिती पाहुन निर्णय घेण्याचे संकेत

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : लोकशाहीमध्ये प्रत्येक पक्षाला कशा पद्धतीने निवडणूक लढायची याचा निर्णय घेण्याचा अधिकार आहे. हा ज्याचा त्याचा निर्णय असतो, मात्र, महायुती म्हणून आम्ही लोकसभा निवडणुका जिंकल्या आणि विधानसभेत प्रचंड बहुमत मिळवले आहे. त्यामुळे स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही महायुतीचाच भगवा डौलाने फडकेल, असा ठाम विश्वास शिवसेना मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवाळी निमित्त वर्षावर आयोजित केलेल्या स्नेहमिलनात पत्रकारांशी बोलताना मुंबई महापालिकेसाठी महायुती एकत्र लढणार असल्याचे स्पष्ट केले असले तरी अन्य महापालिकेत मात्र, स्थानिक परिस्थिती पाहुन निर्णय घेण्याचे संकेत दिले आहेत. काही महापालिकांमध्ये स्वबळावर निवडणुका लढणे महायुतीला फायदेशीर ठरणार असल्याचे फडणवीस म्हणाले.

भाजपला मुंबई महापालिकेत सत्ता आणण्यासाठी महायुती होणे आवश्यक वाटत आहे. मात्र, पुणे, पिंपरी - चिंचवड अशा महत्वाच्या महापालिकांमध्ये मात्र, भाजपा स्वबळावर निवडणूक लढवू इच्छित आहे. त्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुतोवाच केले आहे.

ठाणे महापालिका निवडणूक स्वबळावर लढविण्याबाबत स्थानिक भाजपा नेते वक्तव्य करीत आहेत. त्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अतिशय संयमी प्रतिक्रिया व्यक्त करीत येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुतीचा झेंडा फडकविण्याचा निर्धार व्यक्त केला.

महायुतीबाबत समन्वय समितीत निर्णय : शंभूराज देसाई

राज्यात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीमध्ये एकत्र लढविण्याबाबत स्थानिक पातळीवरून अहवाल मागविण्यात आला आहे. विधानसभा मतदारसंघ निहाय स्थानिक तीनही पक्षाचे स्थानिक खासदार, आमदार आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठका झाल्या आहेत. त्यांच्याकडून अहवाल आल्यानंतर महायुतीच्या समन्वय समितीमध्ये चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे शिवसेना नेते तथा मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.

संघावर बंदीची भाषा चुकीची : शिंदे

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही एक कडवट देशभक्त आणि राष्ट्रभक्त संघटना आहे. देशावर संकट कोसळले की आरएसएस नेहमी मदतीसाठी पुढे सरसावते. आरएसएसवर बंदी घालण्याबाबतचे वक्तव्य हे दुर्दैवी आणि निषेधार्ह असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

लाडकी बहीण योजनेबाबत बोलताना शिंदे म्हणाले की, लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही. लाडक्या बहिणींना भाऊबीज मिळणारच आणि ही योजना अखंडपणे सुरू राहणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT