Eknath Shinde Delhi Visit Pudhari
मुंबई

Eknath Shinde Delhi Visit: शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यामागे नेमकं काय? राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण

मोदी भेट, तातडीच्या बोलावण्या आणि नाराजीच्या चर्चांमुळे वाढली उत्सुकता

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : संसदेच्या अधिवेशन काळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला जातात आणि खासदारांची बैठक घेतात असे सांगितले जात असले तरी त्यांच्या या दिल्ली भेटी मागचीं नक्की कारणे कोणती याबद्दल तर्कना उधान आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना दिलेली वेळ देखील बुचकळयात टाकणारा असून रात्री उद्योगमंत्री उदय सामंत आणि राहुल शेवाळे यांना तातडीने दिल्लीला बोलावून घेतल्याने घडतेय तरी काय अशी विचारणा वाढली.

गेले काही दिवस शिंदे हे भारतीय जनता पक्षाच्या राज्यातील नेत्यांवर कमालीचे नाराज असल्याने ते काही तक्रारीचा पाढा वाचण्यासाठी तेथे गेले असावेत असाही अंदाज व्यक्त केला जातो आहे. भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती झाल्यानंतर शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला काहीसे झुकते घ्यावे लागते आहे. या संदर्भातील तक्रार शिंदे यांनी महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटून केली होती. त्यावेळी त्यांना जागा वाटपात झुकते माप द्या, असे आदेश पाठवण्यात आले होते असेही सांगितले जाते.

मुंबई महापालिकेत शिंदे यांना फारसे यश न आल्याने भारतीय जनता पक्षातील त्यांची पत कमी झाली असल्याची जोरदार चर्चा सुरू असते. त्यामुळेच आता पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटातील काही नाराजांना आम्ही आमच्या पक्षात आणू शकतो आहोत असे सांगायला आणि परवानगी मागायला शिंदे गेले होते काय असाही एक कयास व्यक्त केला जातो आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारने शिंदे यांचे पूर्वीचे काही निर्णय रद्द ठेवले आहेत. त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळातील काही घटनाक्रमामुळे राज्यावरचे आर्थिक ओझे वाढले आहे असेही अधिकारी दबक्या आवाजात सांगत असतात.

आपल्याला योग्य ती भूमिका करायला मिळत नसल्याची तक्रार तर शिंदे यांनी केली नाही ना अशीही शंका व्यक्त केली जाते आहे. सध्या भारतीय जनता पक्षाकडे केंद्रात बहुमत नसल्याने शिंदे हे महत्त्वाचे साथीदार आहेत. अशा परिस्थितीत शिंदे यांनी पंतप्रधानांना भेटून काही मागण्या केल्या आहेत का याबद्दलही अंदाज लावले जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेल्या भेटी वेळी खासदार डॉ श्रीकांत शिंदे उपस्थित होते. त्या भेटीत फारसे काही झाले नाही असेही सांगितले जाते आहे तर काहींनी विधानसभा निवडणुकांमध्ये काही राज्यांची जबाबदारी शिंदे यांनी घ्यायची तयारी दाखवली आहे असेही सांगणे सुरू झाले आहे. ऐन अधिवेशनात शिंदे दिल्लीकडे गेले असल्यामुळे तर्कवितर्क सुरू आहेत.उद्या ते परत आल्यानंतर ही कुजबुज अजून वाढेल.ऑपरेशन टायगर सुरू असून लवकरच सेनेचे काही लोक हाती लावले जातील असेही सांगणे सुरू झाले आहे.अनेक पतंग उडवत दिले जात असून कोणताही तर्क निश्चित नाही, हाती काही आलेले नाही असेही माहितगारांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT