Eknath Shinde Pudhari
मुंबई

Eknath Shinde: विदेशी शक्तींच्या मदतीने षड्‌यंत्र; सर्वोच्च न्यायालयावरील मोर्चावरून एकनाथ शिंदे आक्रमक

मुंबईतील पत्रकार परिषदेत शिंदेंचा विरोधकांवर निशाणा; विदेशी शक्तींच्या मदतीने देशात अराजकता पसरवण्याचे षड्यंत्र असल्याचा आरोप

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: विदेशी शक्तींच्या मदतीने काँग्रेस व इंडिया आघाडीला भारतात अराजकता पसरवायची असून हे आंतरराष्ट्रीय षड्‌यंत्र आहे, अशी घणाघाती टीका शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

काँग्रेस व इंडि आघाडीच्या नेत्यांचा सर्वोच्च न्यायालयावर काढलेला मोर्चा हा भारताच्या इतिहासातील काळा दिवस होता, अशी खरमरीत टीकाही त्यांनी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना केली.

शिंदे म्हणाले की, सोमवारचा दिवस हा देशाच्या इतिहासातला काळा दिवस होता. सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा काढणे, आंदोलन करणे हे यापूर्वी इतिहासात कधीही घडले नाही. विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि इंडि आघाडीचे लोक याचिका दाखल करण्याच्या निमित्ताने सर्वोच्च न्यायालयावर चाल करून गेले, या कृत्याचा तीव्र शब्दांत निषेध करतो, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

ही घटना म्हणजे, भारताच्या सर्वोच्च न्यायव्यवस्थेवर हल्ला आणि सर्वोच्च न्यायव्यवस्थेचा अवमान आहे, याबद्दल विरोधकांनी भारताच्या १४० कोटी जनतेची माफी मागितली पाहिजे, असे ते म्हणाले.

आंदोलनाला शिवतांडवची उपमा देऊन राहुल गांधी यांनी महादेवाचाही अवमान केला. त्यांचे आंदोलन शिवतांडव नसून सत्तेसाठी हपापलेल्या लोकांचा थयथयाट होता, अशी खरमरीत टीका शिंदे यांनी केली.

ते पुढे म्हणाले की, संविधान हातात घेऊन संविधान कसे नष्ट होईल, लोकशाहीचा गळा कसा घोटला जाईल, हे मागील काही दिवसांमध्ये इंडि आघाडीने आंदोलनातून दाखवून दिले. पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर आंदोलन असो किंवा सध्या दिल्लीत दररोज सुरू असलेली राजकीय आंदोलने ही देशासाठी धोकादायक आहेत.

अनेक विदेशी शक्ती भारताला अस्थिर करण्याचा प्रयत्न करताहेत. चीन बलवान झाला तसा भारताला बलवान होऊ देणार नाही, असे काहीजण म्हणाले होते. हा आंतरराष्ट्रीय कटकारस्थानाचा भाग आहे, असा आरोप उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केला. नेपाळ, बांगला देश, श्रीलंकेत जनक्षोभ उसळला, अशी उदाहरणे ते देतात यातून त्यांना काय सांगायचे आहे, असा सवालही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केला.

महायुतीत विसंवाद नाही

दुष्काळाची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकासमवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या बैठकीला एकनाथ शिंदे अनुपस्थित होते. अलीकडेच त्यांनी दिल्लीत भाजप पक्षश्रेष्ठींच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. त्यामुळे शिंदे नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, एकनाथ शिंदे यांनी ही चर्चा फेटाळन लावत आपण नाराज नाही आणि महायुती सरकारमध्ये कोणताही विसंवाद नाही, तर समन्वय असल्याचे शिंदे म्हणाले.

‘ईव्हीएम’बाबत दुटप्‍पी धोरण

विरोधक ‘ईव्हीएम’वर संशय घेतात, निवडणूक आयोगावर हल्ला करतात; मात्र पुरावे देत नाहीत. याच निवडणूक आयोगाच्या कार्यकाळामध्ये तेलंगणा, कर्नाटक, केरळम, तामिळनाडू अशी काही राज्य ते जिंकले; मग तिथे त्यांनी मत चोरी केली असे म्हणायचे का? असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.

विरोधकांनी सरन्यायाधीशांसंदर्भात गंभीर ट्विट केले होते. सरन्यायाधीशांना राजीनामा देण्याबाबत इशारा देण्याची मजल विरोधकांची गेली आहे. ही घातक प्रवृत्ती देशात बळावत असल्याबद्दल उपमुख्यमंत्री शिंदे यांनी चिंता व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT