Eknath Shinde 
मुंबई

Eknath Shinde : रेसकोर्सवर भव्यदिव्य सेंट्रल पार्क

आराखड्याचे सादरीकरण, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईकरांना भेट

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स आणि कोस्टल रोडची मोकळी जागा मिळून एकूण 295 एकरवर जागतिक दर्जाचे सेंट्रल पार्क उभारले जाणार आहे. या प्रस्तावित सेंट्रल पार्कचा आराखडा सोमवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर सादर करण्यात आला. यावेळी मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी, आर्किटेक्ट हाफीज कॉन्ट्रॅक्टर उपस्थित होते.

राज्य निवडणूक आयोग महापालिका निवडणुकीची आचारसंहिता घोषित करण्यापूर्वी एकनाथ शिंदे यांनी मुंबई आणि ठाण्यासाठी काही महत्त्वपूर्ण निर्णयांची घोषणा केल्या. यात मुंबईकरांसाठी आजवरचे हे सर्वात मोठं गिफ्ट असून या ठिकाणी कोणतेही काँक्रीटचे काम होणार नाही. हे सेंट्रल पार्क भूमिगत मार्गाने थेट कोस्टल रोडशी जोडले जाणार आहे. रेसकोर्स आणि त्याच्या ऐतिहासिक वारशाला कुठेही धक्का लागणार नाही, अशी ग्वाही यावेळी एकनाथ शिंदे यांनी दिली.

महालक्ष्मी रेसकोर्सवरील 125 एकर व कोस्टल रोडची 170 एकर असे मिळून 295 एकरचे भव्यदिव्य असे सेंट्रल पार्क तयार केले जाणार आहे. तसेच सेंट्रल पार्कखाली 10 लाख चौरस फुटांचे जागतिक दर्जाचे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सही विकसित केले जाणार आहे. यात आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळांसह खो-खो, कबड्डी अशा मराठमोळ्या खेळांसाठीही सुविधा उपलब्ध होईल. हे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स पर्यावरणपूरक असेल, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

सेंट्रल पार्कमध्ये फिरताना मुंबईकरांना अश्वशर्यतीही पाहता येतील. सेंट्रल पार्कच्या भूपृष्ठावर पदपथ वगळता कोणतेही बांधकाम नाही. हे संपूर्ण उद्यान असेल, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. येथे सुरळीत वाहतूक नियोजनच्या दृष्टीने हे सेंट्रल पार्क 1200 मीटर भूमिगत मार्गाने कोस्टल रोडशी जोडले जाणार आहे. यासाठी 550 कोटींचे टेंडर काढण्यात आले आहे. या सर्व प्रकल्पांचे डिझाईन हाफिज कॉन्ट्रॅक्टर यांनी केले आहे. या प्रकल्पामुळे 300 एकरचे ऑक्सिजन पार्क तयार होणार असल्याने मुंबईच्या हवेतील प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे. मे महिन्यापर्यंत मुंबईतील संपूर्ण रस्त्यांचे काँक्रीटीकरण पूर्ण होईल. 6 डिसेंबर 2026 पर्यंत सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प पूर्ण होतील. महायुती सरकारने ज्या घोषणा केल्या, त्या पूर्ण केल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT