

देवळाली कॅम्प (नाशिक) : स्वा. सावरकरांचा अभिमान बाळगणारी व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणारी आमची शिवसेना आहे. दिलेला शब्द पाळणारा मी शेतकरी पुत्र असल्याने लाडकी बहीण योजना कदापी बंद होऊ देणार नाही, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भगूर येथील सभेत केले. भगूर नगर परिषदेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (दि.२८) शिवाजी महाराज चौकात आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.
सावरकरांचा पदोपदी अपमान करणारे आज मांडीला मांडी लावून शिवसेनेच्या विरोधात लढत आहे. नगर विकास खाते अंतर्गत भगूरच्या विकासाला यापूर्वीही मदत केलेली असून पुढेही निधी कमी पडू दिला जाणार नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अन्यायाविरुद्ध पेटून उठा हा दिलेला संदेश घेऊन सत्ता सोडून २०२२ मध्ये केलेला उठाव हा जनता जनार्दनाच्या सेवेसाठी होता. या कार्यकाळात जनसेवेची कामे करण्याची संधी मिळाली.
समृद्धी महामार्ग, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केल्यानंतर अनेकांनी अडथळे आणले, कोर्टात गेले परंतु जोपर्यंत हा एकनाथ शिंदे आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, ही काळ्या दगडावरची भगवी रेष असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. मंत्री दादा भुसे यांच्यासह उपनेते विजय करंजकर, डॉ. राजश्री अहिरराव यांची भाषणे झाली. व्यासपीठावर राजू लवटे, गणेश कदम, नितीन चिडे, संजय शिंदे, शामराव गणोरे, विक्रम सोनवणे, प्रकाश सुराणा, कैलास गायकवाड, फरीद शेख, अंबादास कस्तुरे, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अनिता करंजकर यांसह सर्व उमेदवार उपस्थित होते.