Eknath Shinde Balasaheb Thackeray Birth Centenary Year: हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज तमाम शिवसैनिकांना अभिवादन करत मोठी घोषणा केली आहे. हे बाळासाहेबांचे जन्मशताब्दी वर्ष असल्याने वर्षभर विविध समाजभिमुख उपक्रम राबवण्यात येणार असून, मुंबईकरांसाठी 'बाळासाहेब ठाकरे आरोग्य आपल्या दारी' हे महत्त्वाकांक्षी अभियान सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
आरोग्य आणि औषधांबाबत महत्त्वाचे निर्णय उपमुख्यमंत्री म्हणाले की, शासन आपल्या दारी या धर्तीवर आता आरोग्य सेवा थेट लोकांच्या घरापर्यंत पोहोचवण्यात येईल. विशेषतः महिलांमधील कॅन्सर, मधुमेह आणि रक्तदाब यांसारख्या 'सायलेंट किलर' आजारांचे वेळीच निदान (Early Detection) करण्यासाठी हे अभियान राबवले जाईल. तसेच मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये 'झिरो प्रिस्क्रिप्शन' धोरण राबवून रुग्णांना सर्व औषधे मोफत मिळतील आणि उपचारांसाठी एकही पैसा खर्च करावा लागणार नाही, अशी ग्वाहि त्यांनी दिली.
गडकोट किल्ल्यांची स्वच्छता आणि मानधन शिवछत्रपतींचे किल्ले ही आपली अस्मिता आहे. या जन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्यातील गडकोट किल्ले स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (MPCB) माध्यमातून ही मोहीम राबवली जाईल. महत्त्वाचे म्हणजे, जे शिवभक्त किंवा एनजीओ (NGO) किल्ल्यांच्या स्वच्छतेचे आणि संवर्धनाचे काम करतील, त्यांना १ लाख रुपयांचे मानधन देण्यात येईल. किल्ल्यांवर शुद्ध पिण्याचे पाणी, आरओ फिल्टर आणि प्लास्टिकमुक्तीवर भर दिला जाईल.
राजकीय स्थिती आणि बाळासाहेबांचे विचार बाळासाहेबांच्या विचारांचे सोने करत असताना गेल्या साडेतीन वर्षांत शिवसेना घराघरात पोहोचली आहे. आज विधानसभा आणि महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेना भाजपपाठोपाठ राज्यातील दुसरा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे, याचा अभिमान मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. "एक सामान्य शाखाप्रमुख राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकला, हे केवळ बाळासाहेबांच्या आशीर्वादामुळेच शक्य झाले," असेही ते म्हणाले.
यावेळी त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी बाळासाहेबांना वाहिलेल्या श्रद्धांजलीचा उल्लेख केला. अयोध्येतील राम मंदिर आणि काश्मीरमधील कलम ३७० हटवणे हे बाळासाहेबांचे स्वप्न मोदी सरकारने पूर्ण केल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. या पत्रकार परिषदेला उदय सामंत आणि सिद्धेश कदम उपस्थित होते.