भाऊ-बहिणीचे नाते कधी घट्ट विणलेले असते, तर कधी सैल असते; पण ते कधीही तुटत नाही
दुर्दैवाने भावंडे एकमेकांच्या पाठीशी उभी राहत नाहीत, तर न्यायालयात एकमेकांविरोधात उभी राहतात
हे नाते आता वाद, भावनिक तणाव किंवा न सुटलेल्या संघर्षाने भरलेले आहे
Bombay High Court on brother-sister dispute
मुंबई : “आपल्या देशात रक्षाबंधन आणि भाऊबीज यांसारखे सण हे बहीण आणि भावाने एकमेकांच्या सुख-दुःखात पाठीशी उभे राहतील, याची हमी देण्यासाठी साजरे केले जातात. भाऊ-बहिणीचे नाते कधी घट्ट विणलेले असते, तर कधी सैल असते; पण ते कधीही तुटत नाही; पण सद्यस्थितीत दुर्दैवाने भावंडे एकमेकांच्या पाठीशी उभी राहत नाहीत, तर न्यायालयात एकमेकांविरोधात उभी राहतात," अशी खंत व्यक्त करत भावंडांमधील नात्यातील कटुता ही लोभ, अहंकार आणि भौतिकवादी जीवनाच्या लालसेतून भाऊ-बहिणीमधील उदात्त आणि मौल्यवान नातेसंबंध खराब झाले आहेत. हे नाते आता वाद, भावनिक तणाव आणि अखंड संघर्षाने भरलेले आहे, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नुकतेच घाटकोपर येथील ज्येष्ठ नागरिक भाऊ-बहिणीच्या मालमत्तेवरील वादावर सुनावणी करताना नोंदवले.
घाटकोपर येथील एका ज्येष्ठ नागरिक भाऊ-बहिणीमधील मालमत्तेवरील वाद न्यायालयात सुरू होता. २००९ च्या बहिण-भाऊ वादात भावाचे वकील नसलेल्या व्यक्तीचे नाव चुकून रेकॉर्डवर आले होते. तसेच बहिणीने खोटी साक्ष दिल्याबद्दल कायदेशीर कारवाई करण्याची मागणीही केली आहे. याविरोधात भावाने आपल्या बहिणीविरुद्ध मानहानीचा (बदनामीचा) खटला भरला होता. या प्रकरणी दिवाणी न्यायालयाने दिलेल्या निकालाविरोधात भावाने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
भावाने दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती जितेंद्र जैन यांच्या एकलपीठासमोर सुनावणी झाली. तुटलेल्या भावंडांच्या नात्याचे मूळ कारण शांतता आणि सलोख्याचे जीवन जगण्याची इच्छा करण्याऐवजी लोभ, अहंकार आणि भौतिकवादी जीवनाची इच्छा हे आहे. अहंकार आणि लोभामुळे भाऊ-बहिणीमधील उदात्त आणि मौल्यवान नातेसंबंध खराब झाले आहेत. हे नाते आता वाद, भावनिक तणाव किंवा न सुटलेल्या संघर्षाने भरलेले आहे, अशी खंत व्यक्त करत भावंडांनी आपल्यामधील वाद न्यायालयात खटले लढविण्याऐवजी त्याग करायला शिकले पाहिजे,” असा सल्ला न्यायमूर्ती जितेंद्र जैन यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.
मोठ्या दुःखाने नमूद करावे लागत आहे की, या प्रकरणातील बहिण आणि भाऊ हे आता ज्येष्ठ नागरिक आहेत. ते अशा वयापर्यंत पोहोचले आहेत की, त्यांनी जीवनाचा इतका जवळून आणि गांभीर्याने अनुभव घेतला आहे. आयुष्याचा इतका मोठा अनुभव असूनही त्यांनी एकमेकांविरुद्ध अशी खालच्या पातळीवरची भाषा वापरावी, हे दुर्दैवी आहे. याआधीही उच्च न्यायालयाने या बहिण आणि भावाला एकमेकांबद्दल वाईट न बोलण्याचे लेखी आश्वासन देण्यास सांगितले होते; पण त्याचा त्यांच्यावर काहीही परिणाम झाला नाही, असेही न्यायमूर्ती जैन यांनी नमूद केले.
या प्रकरणातील भावंडांचे वय लक्षात घेता त्यांच्या वादांवर सलोख्याने तोडगा काढण्यातच त्यांचे हित आहे. अखेर, भाऊ-बहिणीचे नाते कधी घट्ट विणलेले असते, कधी सैल असते, पण ते कधीही तुटत नाही,” असे निरीक्षणही न्यायमूर्ती जैन यांनी व्यक्त केले. तसेच या प्रकरणातील भावाला दिलासा देत आपली बाजू लेखी स्वरूपात मांडण्यासाठी आठ आठवड्यांचा वेळ दिला आहे.
आपल्याकडील भावंडांमधील अनेक खटले म्हणजे न्यायव्यवस्थेवर ताण आणण्याचा आणि एकमेकांविरुद्ध प्रतिहल्ला करण्याचा प्रयत्न आहे. या तुटलेल्या भावंडांच्या नात्याचे मूळ कारण लोभ, अहंकार आणि भौतिकवादी जीवनाची इच्छा याला दिले जाऊ शकते. भावंडांनी त्याग करायला शिकले पाहिजे, असा सल्लाही न्यायमूर्ती जैन यांनी दिला.