नवी मुंबई: यंदाच्या दिवाळीत सर्वसामान्यांपासून घरगुती फराळ, ऑर्डरनुसार फराळ विक्री आणि मिठाई बनविणाऱ्या बड्या हाॅटेल व्यावसायिकांना महागाईची झळ बसणार आहे. गेल्या दोन दिवसांत एपीएमसीतील घाऊक बाजारात साखरेचे दर चार ते आठ रुपयांनी किलोमागे वाढले.
यामुळे दिवाळी सणासुदीत तब्बल ९ हजार ते साडे नऊ हजार टन साखरेची विक्री होऊन ४५ कोटींची उलाढाल होईल अशी अपेक्षा शुगर मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी ‘पुढारी’शी बोलताना व्यक्त केली.
यंदा दिवाळीत महिन्याभरात तब्बल ९ हजार टनाहून अधिक साखरेचे विक्री एपीएमसीतील घाऊक बाजारातून होणार आहे. यातील ४० टक्के साखर ही केवळ दिवाळीतील फराळ, वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाई आणि इतर गोडधोड पदार्थ बनवण्यासाठी खरेदी केली जाते.
सणासुदीचा कालावधी वगळल्यास नियमित दहा ते पंधरा गाडी साखर दररोज मुंबईत विक्री होते. सणासुदीच्या कालावधीत यामध्ये १५ ते २० गाडीची अतिरिक्त भर पडते.
एपीएमसीतील साखर उलाढालीबाबत माहिती देताना घाऊक व्यापारी आणि मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी सांगितले की, एपीएमसीत साखरेचे दर काल गुरुवारपर्यंत किलोला ४८ रुपये होते.
मात्र आज शुक्रवारी हेच दर ५२ ते ५४ रुपये म्हणजे चार ते आठ रुपयांनी वाढले. याचे परिणाम किरकोळ बाजारात उमटले असून किरकोळ बाजारात साखर ६२ ते ६५ रुपये किलोपर्यंत पोहचली आहे.
दिवाळी सणासुदीत दररोज २५ ते ३० गाडी साखरेची एपीएमसीत विक्री होत आहे. यामुळे ही उलाढाल सुमारे ४२ ते ४५ कोटींपर्यंत होण्याची शक्यता असल्याचे अशोक जैन यांनी सांगितले.
शेतकरी आंदोलनाचा साखर दराला फटका
गेल्या वर्षी दिवाळीत कालावधीत एका महिन्यात हजार टन साखर विक्री झाली होती. ३५ कोटी रुपयांची उलाढाल साखर विक्रीतून झाली होती. यावेळी साखर महाग झाल्याने आणि विक्रीत वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन उलाढाल ही सात ते दहा कोटींनी वाढ होईल अशी अपेक्षा घाऊक व्यापाऱ्यांना आहे.
कर्नाटक राज्यातील सीमेवर शेतकऱ्यांनी साखर कारखान्याच्या विरोधात आंदोलन सुरु केले आहे. यामुळे साखरेची आवक या राज्यातून घटली आहे. त्याचा ही परिणाम साखर दरवाढीवर नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात दिसून येण्याची शक्यता आहे. या आंदोलनामुळे साखरेचे दर आणखी किलोमागे दोन रुपयांनी वाढू शकतात.