

मुंबई/नवी मुंबई: मुंबई आणि नवी मुंबईत शुक्रवारी अचानक झालेल्या अवकाळी पावसाने संपूर्ण मुंबईकरांना आणि नवी मुंबईकरांना चकित केले. ऐन ऑक्टोबरच्या शेवटी उन्हाचा चटका सहन करणाऱ्या नागरिकांसाठी हा पाऊस जसा अनपेक्षित होता, तसाच तो काही प्रमाणात दिलासादायक आणि काही भागात गोंधळ उडवणारा ठरला. उकाड्याने त्रस्त झालेल्या मुंबई व नवी मुंबईकरांना या पावसामुळे दिलासा मिळाला.
पावसाने शुक्रवारी सकाळी मुंबईकरांना भिजवले. मुंबई शहरासह पश्चिम व पूर्व उपनगरात सकाळी ९ ते ११ वाजण्याच्या सुमारास ठिकठिकाणी पाऊस पडला.
शुक्रवारी सकाळी मुंबईतील दादर, प्रभादेवी, शिवडी, वडाळा, लालबाग, परळ, काळाचौकी, माटुंगा, घाटकोपर आदी भागात १५ ते २० मिनिट चांगलाच पाऊस झाला. पश्चिम उपनगरातील खार, बांद्रा, सांताक्रुझ, मालाड, मालवणी, कांदिवली, दहिसर, जोगेश्वरी, मार्वे तर पूर्व उपनगरात मुलुंड, विक्रोळी, कुर्ला, भांडुप आदी भागात पाऊस झाला. अन्य ठिकाणी तुरळक पाऊस झाला. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे मुंबईकर मात्र भिजून चिंब झाले. कार्यालयात जाताना अनेकांना भिजतच कामावर जाण्याची वेळ आली.
अवकाळी सरींनी मुंबईकर भिजले
पहाटेपासूनच शहर व उपनगरात ढगाळ वातावरण होते. परंतु पाऊस पडेल, याची शक्यता नव्हती. त्यामुळे घराबाहेर कामानिमित्त पडलेले मुंबईकर अचानक आलेल्या पावसामुळे भिजून चिंब झाले.
काही जण छत्री घेऊन बाहेर पडले, पण मुसळधार पावसामुळे त्यांनाही छत्री असतानाही भिजावेच लागले. पदपथावर उघड्यावर व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांचीही चांगलीच पळापळ झाली. सकाळी भिजत भिजतच अनेक विद्यार्थ्यांनी शाळा गाठली.
नवी मुंबईकरांची तारांबळ उडाली
नवी मुंबई शहरामध्ये ठिकठिकाणी सकाळी तसेच दुपारी काही वेळ पाऊस पडल्याने नवी मुंबईकरांची तारांबळ उडाली. सकाळपासून जाणवणारा उकाडा आणि उष्ण वातावरणानंतर शहरातील विविध भागांत पावसाच्या सरी कोसळल्या.
वाशी, ऐरोली, घणसोली, कोपरखैरणे, नेरूळ आदी भागांतील पावसाच्या हजेरीमुळे रस्त्यांवर नागरिकांची धावपळ उडाली. नवी मुंबईतील काही भागात दुपारी १२.३० ते एकच्या सुमारास पावसाने हजेरी लावल्यामुळे शाळा सुटल्यावर घरी जाताना शालेय मुलांची तारांबळ उडाली. दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांना पावसापासून बचाव करण्यासाठी आसरा शोधावा लागला.
दिवाळीचे कंदील भिजल्याचा विक्रेत्यांना फटका
दिवाळी सणानिमित्त लालबाग दादर या भागात मोठ्या प्रमाणात आकाश कंदील विक्रीसाठी लावण्यात आले आहेत. अचानक आलेल्या पावसामुळे कंदील सुरक्षित स्थळी नेता नेता अनेक कंदील भिजले. यात दिवाळीच्या दिवसात किरकोळ कंदिलाचा व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान झाले.