नवी मुंबई: राजेंद्र पाटील
अवघ्या नऊ दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळीत सोन्याचे दर जीएसटी, घडणावळीसह 1 लाख 45 हजार रुपये तोळा होण्याची शक्यता इंडिया बुलियन अॅण्ड ज्वेलर्स असोसिएशनचे राष्ट्रीय प्रवक्ते कुमार जैन यांनी दै.पुढारीशी बोलताना व्यक्त केली.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे भाव वाढल्यामुळे मुंबईच्या सराफा बाजारात मंगळवारी 10 ग्रॅम सोन्याचा दर 1 लाख 25 हजार 500 रुपयांवर पोहोचला तर बुधवारी त्यात दीड हजार रुपयांची वाढ होऊन हा दर 1लाख 27 हजार रुपयांवर गेला. जीएसटी आणि घडणावळीसह दहा ग्रॅम सोन्यासाठी 1 लाख 40 हजार 810 रुपये मोजावे लागले. दिवाळीत हे दर आणखी भडकू शकतात.
दररोज सराफ व्यावसायिक बुलियन कडून 90 टनाच्या आसपास सोने खरेदी करतात. मात्र बुधवारी मुंबईतील 3500 सराफ व्यावसायिकांकडे केवळ 30 टन सोने विक्रीसाठी उपलब्ध होते. सोने महाग झाल्याचा हा परिणाम असल्याचे कुमार जैन यांचे म्हणणे आहे. सुवर्ण नगरी म्हणून ख्यातकीर्त असलेल्या जळगावातही बुधवारी मंदी दिसून आली. नाशिक, पुणे या शहरातील सराफ बाजारात शुकशुकाट होता.
बुधवारी जागतिक पातळीवर सोन्यामध्येे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक वाढल्याने दर वाढू लागले आहेत. दिवाळीत सोने तोळ्याला 10 हजार रुपये महागणार असल्याचे कुमार जैन म्हणतात. रशिया-युक्रेन युद्ध, इस्रायल-गाझा युद्ध,अमेरिकन फेडरल बँकेने कमी केलेले व्याजदर आणि अनेक देशांच्या सेंट्रल बँकांनी मोठ्या प्रमाणात सुरू केलेली सोने खरेदी यामुळे सोन्याच्या दरात वाढ होत राहणार आहे.
चांदीचा प्रतिकिलो दर 1 लाख 60 हजार रुपयांवर गेला आहे. जीएसटीची तीन टक्के रक्कम धरून सोन्याचा दर साडेतीन आणि चांदीचा दर साडेचार हजारांहून अधिक वाढेल.