

मुंबई : मध्यप्रदेश आणि राजस्थान येथे कोल्ड्रिफ कफ सिरपमुळे लहान मुलांचा मृत्यू झाला. या कफसिरपचा साठा राज्यात औषध दुकानांमध्ये नसला तरी हे कफसिरप ऑनलाईन उपलब्ध होते. त्यामुळे ऑनलाईन औषधांची खरेदी करणार्यांनी या कफसिरपची खरेदी केल्याची शक्यता असल्याने चिंता वाढली आहे.
कोल्ड्रिफ कफ सिरप उत्पादन करणारी औषध निर्मितीतील नामांकित कंपनी नव्हती. तरीही या औषधांना मागणी अधिक असल्याने हे औषध ऑनलाईन उपलब्ध होते मात्र महाराष्ट्रातील औषध दुकानांमध्ये या कंपनीचे कफ सिरप उपलब्ध नसून हे औषध कोणत्याही डॉक्टरांकडून रेफर करत नसल्याने मागणी नसल्याचे औषध दुकानदारांकडून सांगण्यात आले.
बालरोग तज्ज्ञ डॉ. संतोष कदम यांनी सांगितले की, मुंबईसह ठाण्यात लहान मुलांना हे कफसिरप रेफर करत नाहीत. यापूर्वीही हे औषध राज्यात उपलब्ध नसल्याने या औषधाबाबतची कोणतीही माहिती नाही. कफसिरप प्रकरणामध्ये डॉक्टरावरती कारवाई करण्यात आली आहे. मात्र उत्पादन करणार्या कंपनीवर कोणतीही कारवाई झालेली नाही पण यात फक्त डॉक्टरची चुकी नसते. डॉक्टरकडे मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह येतात त्यांच्याकडे असलेले औषध निर्मितीचे लायसन्स आणि अन्न आणि औषध प्रशासन परवानगी असल्यानंतरच डॉक्टर औषधे घेतात. औषध बनावट औषध कंपनीवर कारवाई केल्यास कंपनीचे नाव बदलून पुन्हा नव्या नावाने औषधे बाजारात येत असल्याने औषधांचे उत्पादन होत असलेल्या ठिकाणीच कारवाई होणे आवश्यक असल्याचे एका वरिष्ठ बालरोग तज्ज्ञांकडून सांगण्यात आले.कोल्ड्रिफ औषधे राज्यातील औषध दुकानांमध्ये उपलब्ध नाहीत . फार्मा रेक या कंपनीकडे राज्यातील कोणत्या औषधांचा किती साठा आहे. कोणकोणत्या ठिकाणी आहे याबाबत ची सविस्तर माहिती उपलब्ध आहे. याबाबतची अधिक माहिती फार्मा रेक या सॉफ्टवेअर कंपनीच्या ऑनलाईन डेटामध्ये मिळू शकते. तरीही माहितीसाठी आजपर्यंत एफडीएकडून कोणतीही मागणी या कंपनीकडे करण्यात आलेली नसल्याचे अभय पांडे यांनी सांगितले.
महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनाने आणखी दोन कफ सिरपवर बंदी घातली. दोन्ही कफ सिरप उत्पादक कंपन्या गुजरातमधील आहेत. मध्य प्रदेशातून मिळालेल्या काही औषध फॉर्म्युलेशनमध्ये डायथिलीन ग्लायकोल अशुद्धता अनुज्ञेय मर्यादेपेक्षा जास्त आढळून आली. रेस्पिफ्रेश टीआर आणि रिलाइफ यादोन सिरपमध्ये देखील डायथिलीन ग्लायकोलचे प्रमाण निर्धारित मानकापेक्षा अनेक पट जास्त आहे. औषधांमध्ये या रसायनाचा अतिरेकी वापर मानवी शरीरासाठी अत्यंत विषारी आहे. या औषधांचाही साठा आता शोधून तो जप्त करण्यात येणार आहे.