

मुंबई : विधान भवन परिसर, चर्चगेट, हुतात्मा चौक, सीएसएमटी रेल्वे स्थानक इत्यादी दक्षिण मुंबईतील रस्त्यांवर होणार्या वाहतूक कोंडीवर आता मेट्रोचा उतारा सापडला आहे. आरे ते वरळीपर्यंतच्या मेट्रो 3 भुयारी मार्गिकेचा विस्तार कफ परेडपर्यंत करण्यात आला असून आजपासून आरे ते कफ परेड हे अंतर केवळ एका तासात पार करता येणार आहे.
कुलाबा-वांद्रे-सीप्झ या 33.5 किमीच्या मेट्रो 3 भुयारी मार्गिकेच्या आरे ते बीकेसी या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये झाले होते. त्यानंतर यावर्षी मे महिन्यात बीकेसी ते आचार्य अत्रे चौक या टप्प्याचे लोकार्पण झाले. सध्या आरे ते आचार्य अत्रे चौक या टप्प्यात दैनंदिन 262 फेर्या चालवल्या जात आहेत. दैनंदिन प्रवासी संख्या 70 ते 80 हजारांच्या दरम्यान आहे. ही मार्गिका पूर्ण सुरू झाल्यानंतर प्रवासी संख्या वाढणे अपेक्षित आहे.
बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भुयारी मेट्रोच्या अखेरच्या टप्प्याचे लोकार्पण करण्यात आले. आजपासून आरे ते कफ परेड अशा संपूर्ण मार्गिकेवर मेट्रोच्या फेर्या सुरू होतील. दिवसभरात 280 फेर्या चालवल्या जातील. विविध मेट्रो मार्गिकांची जोडणी मिळाल्यानंतर दैनंदिन प्रवासी संख्या 14 ते 17 लाखांवर पोहोचणे अपेक्षित आहे.
सीएसएमटी, चर्चगेट या अतिमहत्त्वाच्या रेल्वे स्थानकांतून प्रवास करणार्या लाखो प्रवाशांना भुयारी मेट्रोमुळे दिलासा मिळेल. काही मिनिटांच्या कालावधीत इच्छित स्थळी पोहोचता येईल. तसेच रेल्वेगाड्यांमध्ये होणार्या तुडुंब गर्दीपासून सुटका होईल अशी आशा प्रवाशांना आहे. सध्या आरे ते आचार्य अत्रे चौक या टप्प्यात वोडाफोनद्वारे नेटवर्क सेवा सुरू आहे. हीच सेवा कफ परेडपर्यंत चालवली जाणार आहे. मात्र बुधवारी संध्याकाळपर्यंत कफ परेड स्थानकात नेटवर्क पोहोचले नव्हते.
बुधवारी उद्घाटन झालेल्या, पूर्णपणे भूमिगत मुंबई मेट्रो-3 अक्वा लाईनला आरे ते कफ परेड 33.5 किमीसाठी एकमेव वीजपुरवठादार म्हणून टाटा पॉवरची निवड झाली आहे. हा वीजपुरवठा टाटा पॉवरच्या धारावी, महालक्ष्मी आणि साकी रिसीव्हिंग स्टेशनमधून 110 केव्ही लाईनद्वारे केला जाईल. मुंबई मेट्रो-3 साठी एकूण जोडलेला लोड सुमारे 40 मेगावॅट आहे, तर मेट्रो-1 साठी तो सुमारे 8 मेगावॅट आहे.
बुधवारी विज्ञान केंद्र आणि कफ परेड या दोन मेट्रो स्थानकांचे प्रवेशद्वार उघडण्यात आले होते. यामुळे प्रवेशद्वारावर प्रवाशांनी गर्दी केली होती. मेट्रो स्थानकाबाहेर लावलेल्या नकाशावर आपल्या प्रवासाचा मार्ग प्रवासी शोधत होते. मच्छिमार कॉलनीत राहणारे ओमकार तांडेल हे ग्रॅण्ट रोडला कामाला जातात. गर्दीने खचाखच भरलेल्या बसमध्ये चढायला मिळत नाही. त्यामुळे आता मेट्रोने जाणे सोयीचे होईल, असे त्यांनी सांगितले. कफ परेड परिसरात परिचारिका म्हणून काम करणार्या मनिषा रौतेला महिन्यातून एकदाच आपल्या नवी मुंबईच्या घरी जातात. कफ परेड ते सीएसएमटीपर्यंत प्रवास करताना अर्धा-पाऊण तास वाहतूक कोंडीत अडकावे लागते. पण आता मेट्रोमुळे सीएसएमटी किंवा दादर कोठेही जाऊन ट्रेन पकडता येईल, असे त्यांनी सांगितले.