Digvijay Singh Meets Uddhav Thackeray
मुंबई: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच, आज काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची त्यांच्या 'मातोश्री' निवासस्थानी भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस हायकमांडने महत्त्वपूर्ण प्रस्ताव दिग्विजय सिंग यांच्यामार्फत उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवला आहे.
गांधी कुटुंबियांचे अत्यंत विश्वासू अशी म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी मुंबई महापालिका निवडणुकीसंदर्भात प्रामुख्याने चर्चा झाली. या चर्चेत काँग्रेस हायकमांडने स्पष्ट निरोप दिला आहे की, ठाकरे बंधूंनी काँग्रेससोबत आघाडी करूनच निवडणूक लढवावी. इतकेच नव्हे तर, या महाविकास आघाडीत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेससह सर्व मित्रपक्षांनी एकत्रितपणे निवडणूक लढवावी, असाही प्रस्ताव दिग्विजय सिंग यांनी मांडल्याची माहिती सूत्रांनी दिली.या महत्त्वपूर्ण भेटीनंतर किंवा झालेल्या चर्चेबद्दल उद्धव ठाकरे यांच्याकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे आता दिग्विजय सिंग यांनी दिलेला हा 'युती'चा प्रस्ताव ठाकरे बंधू मान्य करतात का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
या भेटीमागील दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे, येत्या १४ डिसेंबर रोजी दिल्लीतील रामलीला मैदानावर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या 'मत चोरीविरोधातील' महारॅलीमध्ये उद्धव ठाकरे यांनी सहभागी व्हावे, यासाठी त्यांना निमंत्रण देणे हे होते.या महारॅलीसाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, आणि राष्ट्रीय जनता दलाचे तेजस्वी यादव यांनाही निमंत्रण देण्यात आले आहे.मागील वर्षी संसदेच्या हिवाळी अधिवेशनावेळी उद्धव ठाकरे दिल्लीला गेले होते. आता ते पुन्हा दिल्लीला जाणार का, याकडेही राजकीय निरीक्षकांचे लक्ष वेधले आहे. आता आगामी दिल्ली दौऱ्यावेळीच मुंबई महापालिका निवडणुकीतील युतीसंदर्भात अंतिम चर्चा होण्याची दाट शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.