Digital Arrest Pudhari
मुंबई

Digital Arrest Scam: डिजिटल अरेस्टच्या नावाने निवृत्त बँक व्यवस्थापकाला ३.८४ कोटींंचा गंडा;खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी

१५० खात्यांतून २ कोटी गोठवले

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली सायबर भामट्यांनी जुहूतील ६४ वर्षीय निवृत्त बँक व्यवस्थापकाला तब्बल ३ कोटी ८४ लाख रुपयांना गंडा घातला. मुंबई आणि लखनौ एटीएसचे अधिकारी असल्याचे भासवून आरोपींनी त्याला दहा दिवस व्हॉट्सॲप व्हिडीओ कॉलवर ठेवले.

त्याच्या नावाने जम्मू-काश्मीरमध्ये बँक खाते उघडण्यात आल्याचे आणि त्यात आलेले ७ कोटी रुपये दहशतवादी कारवायांसाठी वापरण्यात आल्याचे सांगत अटक करण्याची धमकी देण्यात आली.

घाबरलेल्या निवृत्त अधिकाऱ्याने आपली बचत, गुंतवणूक, शेअर्स आणि म्युच्युअल फंडांची माहिती दिली. त्यानंतर आरोपींच्या सांगण्यावरून चार ऑनलाइन व्यवहारांतून ३.८४ कोटी रुपये विविध खात्यांत वर्ग केले.

आरोपीने स्वतःची ओळख कोलबा येथील एटीएस मुख्यालयातील उपनिरीक्षक आकाश शर्मा अशी करून दिली. त्याच्या आधारकार्डशी जोडलेल्या नावावर ३१ जुलै रोजी बेकायदा सिमकार्ड घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.

यानंतर व्हॉट्सॲपवरून दुसऱ्या व्यक्तीशी संपर्क साधण्यास सांगण्यात आले. त्याने स्वतःला लखनौ एटीएसचा अधिकारी प्रेम कुमार गौतम असल्याचे सांगितले. पीडिताच्या कागदपत्रांचा वापर करून जम्मू-काश्मीरमध्ये बँक खाते उघडण्यात आले असून त्यात ७ कोटी रुपये जमा झाले आणि त्यातील रक्कम दहशतवादी कारवायांसाठी वापरली गेल्याचा दावा करण्यात आला. काही अहवालांनुसार आरोपींनी २०२५च्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी संबंधित सिमकार्ड असल्याचेही सांगून भीती निर्माण केली.

आरोपींनी निवृत्त बँक व्यवस्थापकाला सतत व्हॉट्सॲप व्हिडीओ कॉलवर राहण्यास सांगितले. त्याने आपले लोकेशनही शेअर करावे आणि कुटुंबीयांशी या प्रकरणाबाबत कोणतीही चर्चा करू नये, अशी सक्त ताकीद देण्यात आली. कुटुंबीयांनाही अटक करण्याची धमकी देण्यात आली.

आरोपींनी सर्वोच्च न्यायालयाने अटक वॉरंट बजावल्याचे भासवणारे बनावट कागदपत्र तसेच रिझर्व्ह बँकेच्या नावाचे पत्रही पाठवले. चौकशी पूर्ण झाल्यानंतर पैसे परत करून ‘नॉन-इनव्हॉल्व्हमेंट सर्टिफिकेट’ देण्याचे आमिष दाखवण्यात आले.

काही खाती ‘म्यूल अकाउंट’

पश्चिम विभाग सायबर पोलिसांनी २१ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल केला आहे. व्यक्तीची बनावट ओळख धारण करणे, फसवणूक आणि बनावट कागदपत्रांचा वापर केल्याप्रकरणी अज्ञात आरोपींविरुद्ध तपास सुरू आहे.

सुरुवातीला रक्कम चार खात्यांत जमा झाली. त्यानंतर ती विविध राज्यांतील सुमारे १५० बँक खात्यांमध्ये वळवण्यात आली. यापैकी सुमारे २ कोटी रुपये गोठवण्यात पोलिसांना यश आले असून, उर्वरित रकमेचा माग काढण्याचे काम सुरू आहे. काही खाती ‘म्यूल अकाउंट’ असल्याचेही तपासात आढळले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT