मुंबई : डिजिटल अरेस्टची भीती दाखवून एका 79 वर्षांच्या वयोवृद्धाची 2 कोटी 65 लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आले आहे. या प्रकरणी जयेश जयंत झव्हेरी या 55 वर्षांच्या सायबर ठगाच्या सहकाऱ्याला उत्तर प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांनी अटक केली.
आरोपीकडून पोलिसांनी गुन्ह्यांतील चौदा मोबाईलसह सतरा सिमकार्ड, पाच डेबीट कार्ड, पंधरा चेकबुक, चार रबरी स्टॅम्प, अनेक इसमांचे आधारकार्ड, पॅनकार्ड, बँक खाते उघडण्यासाठी आवश्यक कागदपत्रे आदी मुद्देमाल जप्त केला आहेत. तक्रारदार वयोवृद्ध असून ते उत्तर मुंबईत त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतात. 26 सप्टेंबर ते 7 नोव्हेंबर 2025 रोजी त्यांना अज्ञात व्यक्तींनी पोलीस गणवेशात व्हिडीओ कॉल करुन मनी लॉड्रिंगच्या गुन्ह्यांत सहभागी असल्याचा आरोप केला. त्यांची व्हिडीओ कॉलद्वारे चौकशी सुरू केली होती.
या चौकशीदरम्यान त्यांना त्यांच्या राहत्या घरी डिजीटल अरेस्टची धमकी दिली होती. त्यांचा विश्वास बसावा म्हणून त्यांना वेगवेगळ्या शासकीय विभागाच्या स्वाक्षरी केलेले पत्र तसेच कोर्ट नोटीस पाठविले होते. डिजिटल अरेस्टदरम्यान ते व्हॉटअप व्हिडीओ कॉलद्वारे सर्व्हेलन्सवर आहेत असे सांगून त्यांच्या आर्थिक व्यवहाराची माहिती काढण्याचा प्रयत्न केला होता. त्यांना वेगवेगळ्या बँक खात्यात पैसे ट्रान्स्फर करण्यास प्रवृत्त केले होते. अटकेसह कारवाईच्या भीतीने त्यांनी संबंधित बँक खात्यात 2 कोटी 65 लाख 11 हजार 400 रुपये ट्रान्स्फर केले होते.
ही रक्कम चौकशीनंतर त्यांच्या खात्यात पुन्हा ट्रान्स्फर करणार असल्याचे सांगण्यात आले होते, मात्र त्यांनी ती रक्कम त्यांच्या बँक खात्यात पाठविली नाही. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी उत्तर सायबर सेल पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी भारतीय न्याय सहिता आणि आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला होता. गुन्हा दाखल होताच जयेश झव्हेरी याला ताब्यात घेतले होते. चौकशीत त्याचा या गुन्ह्यांत सहभाग उघडकीस आला. त्याने फसवणुकीसाठी सायबर ठगांना बँक खाती पुरविले होते.