मुंबई : मुंबई महानगर प्रदेशात परवडणाऱ्या घरांच्या किमतीत 17 टक्क्यांची वाढ झाली आहे. तर आलिशान घरांच्या किमतीत 43 टक्क्यांची वाढ झाली आहे. परवडणाऱ्या घरांचा सध्याचा दर 6 हजार 450 प्रतिचौरस फूट आहे. आलिशान घरांसाठी हा दर तब्बल 40 हजार 200 प्रति चौरस फूट आहे.
देशभरातल्या 7 महत्त्वाच्या शहरांमध्ये ॲनारॉकने केलेल्या सर्वेक्षणानुसार देशभरात परवडणाऱ्या घरांच्या किंमती 26 टक्क्यांनी तर आलिशान घरांच्या किमती 40 टक्क्यांनी वाढल्या. सर्व 7 शहरांमध्ये महामुंबईतील घरांच्या किमती सर्वाधिक आहेत. 40 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या परवडणाऱ्या घराची किंमत 6 हजार 450 प्रति चौरस फूट आहे. 40 लाख ते दीड कोटी या मध्यम किमतीच्या घरांचा दर 16 हजार 400 प्रति चौरस फूट आहे. दीड कोटींपेक्षा अधिक किमतीच्या घरांचा दर 40 हजार 200 प्रतिचौरस फूट आहे.
पुण्यात परवडणाऱ्या घरांची किंमत 5 हजार 850 प्रतिचौरस फूट आहे. यात गेल्या 3 वर्षांत 22 टक्क्यांनी वाढ झाली. मध्यम किमतीच्या घरांचा दर 21 टक्क्यांनी वाढून 8 हजार 850 रुपये झाला आहे. आलिशान घरांचा सध्याचा दर 15 हजार 200 प्रति चौरस फूट असून यात 29 टक्क्यांनी वाढ झाली.