मुंबई : डिजिटल युगात मोबाईलच्या आहारी गेलेल्या मुलांच्या हातात आता पुस्तकांचे वजन जाणवेनासे झाले आहे. इंटरनेटच्या झपाट्याने वाढलेल्या विश्वात झटपट माहितीचा वर्षाव होत असला, तरी विचार, चिंतन आणि मूल्यांची खोली ही फक्त पुस्तकांच्या वाचनातूनच तयार होते, असा सूर ‘वाचन प्रेरणा दिना’निमित्त तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
सध्या बहुसंख्य मुले वास्तवापेक्षा आभासी जगात रमली असली, तरी त्यांना परत वास्तवाशी जोडण्यासाठी पुस्तकांचे वाचनच सर्वात प्रभावी माध्यम आहे, डिजिटल जगात हरवलेली ही पिढी जर ‘स्क्रीन’वरून ‘पानां’कडे वळली, तर विचारशील आणि संवेदनशील समाज घडवण्याची खरी जबाबदारी आहे. यातूनच प्रत्येक दिवस ‘वाचन प्रेरणा दिन’ साकार होईल, असा सल्लाही दिला आहे.
वाचन हा केवळ ज्ञानार्जनाचा मार्ग नसून, तो विचार करायला, प्रश्न विचारायला आणि योग्य निष्कर्षापर्यंत पोहोचायला शिकवतो, असे शैक्षणिक सल्लागार सुदाम कुंभार यांनी सांगितले. मोबाईलवरील झटपट माहिती क्षणभंगुर असते; पण वाचन मनाची खोली वाढवते आणि चिंतनशील दृष्टी देते. म्हणूनच पालक, शिक्षकांनी मुलांना बालपणीच वाचनाची गोडी लावणे गरजेचे आहे. वाचन प्रेरणा दिन हा केवळ औपचारिक साजरा करण्याचा दिवस नसून, दररोज काही वेळ वाचनासाठी अर्पण करण्याचा आणि नवी पिढी विचारशील बनवण्याचा संकल्प आहे, असे ते म्हणाले.
आजची शाळकरी पिढी तंत्रज्ञानाशी नाळ जोडून वाढत असली, तरी या नात्याचा संतुलित वापर गरजेचा असल्याचे समुपदेशक जयवंत कुलकर्णी यांनी नमूद केले. शिक्षक आणि पालकांनी पारंपरिक अध्ययन पद्धतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत या पिढीशी सुसंवाद साधावा. मोबाईलचा अतिरेकी वापर टाळून त्याचा सर्जनशील वाचन आणि लेखनासाठी उपयोग होईल, अशी दिशा देणे आवश्यक आहे. इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या समृद्ध देशी-विदेशी साहित्याचा वापर करून वाचनसंस्कृती रुजवली, तर जेन.झी. पिढी स्वतःचा वैचारिक अवकाश विस्तारू शकेल, असे त्यांनी सांगितले.
‘बालभारती’च्या किशोर मासिकाचे कार्यकारी संपादक किरण केंद्रे यांनी वाचनसंस्कारांच्या संवर्धनासाठी आम्ही उपक्रम करत आहोत. “किशोरवयीन मुलांमध्ये दर्जेदार साहित्याची गोडी निर्माण करण्याचे काम आम्ही अविरत करत आहोत. अभ्यासक्रमाबाहेरचे ज्ञान, संवेदनशीलतेचे मूल्य वाचनातूनच निर्माण होतात. कोवळ्या मनावर जे ठसते, त्याचा ठसा कायम राहतो. त्यामुळे पालकांनी मुलांना पुस्तक प्रदर्शन, साहित्य संमेलने आणि वाचन उपक्रमांकडे वळवावे,” असे केंद्रे म्हणाले.
पालक, शिक्षक आणि समाजाने एकत्र येऊन बालपणीच वाचनाची गोडी लावणे गरजेचे आहे. वाचन प्रेरणा दिन हा दिवस फक्त औपचारिक साजरा करण्यासाठी नाही; हा दररोज मुलांसाठी वाचनाचा वेळ निश्चित करण्याचा संकल्प घ्यायचा दिवस आहे.सुदाम कुंभार, शैक्षणिक सल्लागार, विद्या विकास एज्युकेशन सोसायटी, विक्रोळी
अभ्यासक्रमाबाहेरचे ज्ञान, जीवन मूल्ये, संवेदनशीलता आणि जगण्याशी संबंधित संदर्भ वाचनातूनच समजतात. कोवळ्या मनावर जे ठसते, त्याचा ठसा कायम राहतो. पालकांनी मुलांना पुस्तक प्रदर्शन, साहित्य संमेलने, उत्तम मासिके वाचनासाठी प्रोत्साहित करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.किरण केंद्रे, (किशोर मासिक), बालभारती
आजची शाळकरी पिढी तंत्रज्ञानाशी जोडलेली असून मोबाईल, टॅब आणि विविध एप्लिकेशन्स त्यांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहेत. शिक्षक आणि पालकांनी पारंपरिक अध्ययन पद्धतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन मुलांशी सुसंवाद साधणे गरजेचे आहे.जयवंत कुलकर्णी, समुपदेशक