मुंबई : सीएमआरएस प्रमाणपत्र मिळूनही वाहतुकीसाठी सज्ज असलेली मेट्रो 2 ब लोकार्पणाच्या प्रतीक्षेत आहे. अनेकदा नियोजन करूनही या मेट्रोचे लोकार्पण अद्याप होऊ शकलेले नाही. आज 4 डिसेंबर रोजी नियोजित असलेला कार्यक्रमही घोषणा होण्याआधीच रद्द करण्यात आला आहे.
अंधेरी पश्चिम ते मंडाळे या मेट्रो 2 ब मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण होऊन सीएमआरएस प्रमाणपत्र मिळाले आहे. पहिल्या टप्प्यात डायमंड गार्डन ते मंडाळे या 5.6 किमीच्या मार्गिकेचा समावेश आहे. भुयारी मेट्रोच्या अंतिम टप्प्यासोबतच मेट्रो 2 ब मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण केले जाणार होते. मात्र तोपर्यंत सीएमआरएस प्रमाणपत्र न मिळाल्याने हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला. त्यानंतर सीएमआरएस प्रमाणपत्र प्राप्त झाले व ऑक्टोबरच्या अखेरीस लोकार्पण करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वेळ न मिळाल्याने पुन्हा हा कार्यक्रम पुढे ढकलावा लागला.
लोकार्पण कधी?
सध्या पहिला टप्पा पूर्ण तयार असूनही व सीएमआरएस प्रमाणपत्र मिळूनही पूर्व उपनगरवासीयांना मेट्रो प्रवासाची सुविधा उपलब्ध झालेली नाही. पण नवीन वर्ष सुरू होण्याआधीच मेट्रोचे स्वप्न पूर्ण होणार आहे. 4 डिसेंबरला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते डायमंड गार्डन ते मंडाळे या टप्प्यातील मेट्रोचे लोकार्पण करण्याचे नियोजन करण्यात आले होते; मात्र तरीही या कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली नाही. यासोबत नियोजित असलेला ऑरेंज गेट ते मरिन ड्राइव्ह टीबीएम लॉन्च सोहळा बुधवारीच पार पडला; पण अद्याप मेट्रोच्या लोकार्पणाबाबत स्पष्टता नाही.
तीन टप्प्यांत लोकार्पण
मेट्रो 2 ब मार्गिकेचे लोकार्पण तीन टप्प्यांत करण्यात येणार आहे. मंडाळे ते डायमंड गार्डन या पहिल्या टप्प्यानंतर डायमंड गार्डन ते सारस्वत नगर मेट्रो स्थानक असा दुसरा टप्पा असेल. त्यानंतर सारस्वत नगर ते अंधेरी पश्चिम असा तिसरा टप्पा असेल. अंधेरी येथे मेट्रो 2 अ आणि मेट्रो 2 ब या दोन्ही मार्गिका जोडल्या जातील. संपूर्ण मार्गिका कार्यरत झाल्यानंतर मंडाळे ते दहिसर असा सलग प्रवास करता येईल.