

मुंबई ः मुंबईवर झालेल्या 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यातील लढवय्ये आयपीएस आणि राष्ट्रीय तपास संस्थेचे (एनआयए) विद्यमान महासंचालक सदानंद दाते नवीन वर्षात महाराष्ट्राचे नवे पोलीस महासंचालक म्हणून सूत्रे हाती घेतील, हे जवळ जवळ निश्चित झाले आहे असे खात्रीलायक वृत्त आहे.
सदानंद दाते महाराष्ट्रातूनच प्रतिनियुक्तीवर केंद्राच्या सेवेत एनआयएचे प्रमुख म्हणून गेलेले आहेत. या प्रतिनियुक्तीतून म्हणजेच एनआयए प्रमुख पदाच्या जबाबदारीतून मुक्त करा आणि महाराष्ट्रात परत पाठवा अशी विनंती राज्य सरकारने केंद्राला केल्याचे गृहमंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले. त्यानुसार सदानंद दाते यांना केंद्राच्या प्रतिनियुक्तीतून मुक्त करण्याचा निर्णय डिसेंबरच्या उत्तरार्धात होईल, असे दिसते.
सदानंद दाते यांची पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती अद्याप जाहीर झालेली नाही. मात्र ती निश्चित मानली जाते. येत्या 31 डिसेंबरला विद्यमान पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला निवृत्त होतील. त्यांच्या जागेवर 1 जानेवारीपासून दाते महाराष्ट्र पोलीस दलाच्या प्रमुख पदाची सूत्रे हाती घेऊ शकतात.
कडक शिस्तीचा, कर्तव्यनिष्ठ अधिकारी म्हणून लौकिक असलेले सदानंद दाते यांनी महाराष्ट्र पोलीस दलात आर्थिक गुन्हे शाखा, सायबर क्राईममध्ये छाप पाडणारे काम केले आहे. आर्थिक गुन्हे क्षेत्रात तर त्यांनी डॉक्टरेट मिळवली आहे. सीआरपीएफमध्ये असताना छत्तीसगढच्या नक्षलग्रस्त भागात त्यांनी प्रभावी कामगिरी बजावली. त्यांच्या कारकिर्दीतील कसोटीचा क्षण होता तो 26/11चा हल्ला.
मुंबईवर तुटून पडलेल्या दहापैकी दोघा अतिरेक्यांशी दाते यांनी कामा रुग्णालयात दोन तास झुंज दिली. या पराक्रमाबद्दल त्यांचे नाव खास करून घेतले जाते. अशा पराक्रमी दातेंच्या हाती नववर्षात पोलीस दलाची सूत्रे जाण्याचे संकेत मिळाल्याने या संभाव्य नियुक्तीबद्दल पोलीस अधिकारी वर्तुळातही चांगली चर्चा आहे.