मुंबई: धारावी आणि काळा किल्ला बस आगारांची जमीन देऊन दोन्ही डेपोचा पुनर्विकास करण्यासाठी धारावी पुनर्विकास प्रकल्प, झोपु प्राधिकरण आणि मे.नवभारत मेघा डेव्हलपर्स प्रा.लि. या पक्षकारांसमवेद त्रिपक्षीय करारनाम्यास अखेर मंगळवारी बेस्ट समितीने मंजुरी दिली.
धारावीत मोक्याच्या 11.58 एकर जागेवर बेस्टची ही दोन आगारे आहेत. त्यामुळे पर्यायी जागेचा अभ्यास करून नंतरच हा प्रस्ताव चर्चेसाठी ठेवावा, अशी मागणी विरोधकांची होती. मात्र, या प्रस्तावावर अधिक चर्चा न करता तसेच इतर सदस्यांना अधिक बोलायला न देता प्रस्ताव अध्यक्षांनी घाईघाईने मंजूर केला.
मंगळवारी बेस्ट समितीच्या बैठकीत ‘धारावी पुनर्विकास प्रकल्प प्रस्ताव क्र.58 चर्चेसाठी होता. बेस्ट जमीन असलेल्या धारावी व काळा किल्ला बस आगारांच्या पुनर्विकासात बेस्टला दोन आगारांसाठी दोन ठिकाणी वेगवेगळ्या जागा मिळणार आहेत.
मात्र ही जागा अदानीच्या घशात घातली जाणार असल्याने या बैठकीत हा प्रस्ताव मंजूर होऊ नये, याला आमचा विरोध आहे, अशी भूमिका उबाठा समिती सदस्य नितीन नांदगावकर यांनी घेतली. जेव्हा जेव्हा अदानीचा विषय आला की बेस्ट प्रशासनाकडून तत्परता दाखवली जाते.
मात्र कामगारांचा विषय आला की, बेस्टकडून वेळकाढूपणा केला जातो, मग हा भेदभाव का? व कशासाठी केला जातो? तसेच याविषयी आम्हांला अधिक माहिती घ्यावी लागेल. त्यामुळे हा प्रस्ताव पुढील बैठकीत घेण्यात यावा, आम्हांला थोडा वेळ द्या, आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ, असेही नांदगावकर म्हणाले. काँग्रेस सदस्य चंद्रकांत मजलीकर यांनीही या प्रस्तावाला यावेळी जोरदार विरोध दर्शविला.
दरम्यान, धारावीचा प्रस्ताव गेल्या बैठकीत मंजूर करण्यात आला नव्हता. तो पुढे ढकलण्यात आला होता. त्यामुळे आम्हांला सीएम साहेबांना उत्तर द्यावे लागते आणि हा विषय किती दिवस प्रलंबित ठेवणार, असे बेस्टचे महाव्यवस्थापक सोनिया सेठी यांनी सांगत प्रस्ताव मंजूर करण्याची विनंती केली.