

कोपरखैरणे: आशियातील सर्वात मोठी असलेली मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) देशातील पहिला राष्ट्रीय बाजार झाला असून संचालक मंडळ बरखास्त करीत पणनमंत्री जयकुमार रावळ यांनी मंगळवारी प्रशासकीय मंडळाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला.
शेतकरी केंद्रबिंदू ठेवत व्यापारी कामगार आणि ग्राहक यांच्यात ताळमेळ राखणारी ही बाजार समिती निर्माण करण्यात येणार असून राज्यातील कृषी पणन व्यवस्थेत मोठा बदल केला जाणार असल्याचे यावेळी रावळ यांनी सांगितले.
एपीएमसीच्या प्रशासकीय इमारतीत आयोजित कार्यक्रमात रावळ यांनी पदभार स्वीकारला. यावेळी पणन संचालक तथा सचिव शरद जरे यांनी त्यांचे स्वागत केले. आगामी काळात आवश्यक प्रशासकीय नियुक्त्या, जबाबदाऱ्यांचे वाटप आणि कारभारातील सुधारणांबाबत निर्णय घेतले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
एपीएमसी ही देशातील प्रमुख कृषी बाजारपेठांपैकी एक असून आयात-निर्यातीच्या मोठ्या व्यवहारांचे केंद्र आहे. त्यामुळे राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार म्हणून तिच्या विकासाला विशेष प्राधान्य दिले जाणार आहे.
भविष्यात राष्ट्रीय महत्त्वाच्या बाजारपेठांचे जाळे उभारण्याबरोबरच सुमारे 1100 ते 1200 एकर क्षेत्रावर जागतिक दर्जाची कृषी बाजारपेठ उभारण्याचा सरकारचा संकल्प असल्याचेही त्यांनी नमूद केले.
बाजार समितीतील भ्रष्टाचार, गैरव्यवहारांबाबत पत्रकारांनी विचारणा केली असता रावळ यांनी कोणतीही अनियमितता खपवून घेतली जाणार नसल्याचे स्पष्ट केले. तसेच पदभार स्वीकारल्यानंतर एपीएमसीतील कर्मचाऱ्यांसोबत झालेल्या पहिल्याच बैठकीत पारदर्शक आणि जबाबदार प्रशासनाचा संदेश देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
पुनर्विकासाचा आढावा
एपीएमसीमधील जीर्ण इमारती, कांदा-बटाटा बाजाराची अवस्था, अतिक्रमणे, गटार व्यवस्था आणि पावसाळ्यात पाणी साचण्याच्या समस्यांवरही त्यांनी चिंता व्यक्त केली. बाजार समिती स्थलांतरित करण्याचा सध्या कोणताही प्रस्ताव नसल्याचे स्पष्ट करत आवश्यक दुरुस्ती, पुनर्विकास आणि मूलभूत सुविधांबाबत तातडीने आढावा घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले. पुढील महिनाभरात प्रत्यक्ष पाहणी करून परिस्थितीचा सविस्तर आढावा घेणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
सूचना, तक्रारींसाठी स्वतंत्र ई-मेल
मुंबई एपीएमसीच्या अध्यक्षांशी संबंधित सूचना, तक्रारी आणि पत्रव्यवहारासाठी chairman.mumbaimni@gmail.com हा स्वतंत्र ई-मेल आयडी सुरू करण्यात आल्याची माहिती बाजार समितीचे सचिव शरद जरे यांनी दिली. अध्यक्ष कार्यालयाशी संबंधित सर्व पत्रव्यवहार यापुढे या माध्यमातून स्वीकारला जाणार आहे.
शेतकरी ते ग्राहक या सारखळीतील सर्व घटकांचा विचार केला जाणार आहे. शिवाय पायाभूत सुविधा जसे कोल्ड स्टोअरेज, गोदामे, बाजार व्यवस्था आणि निर्यातसाखळी सक्षम करून महाराष्ट्रातील शेतीमालाला राष्ट्रीय तसेच जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा सरकारचा प्रयत्न राहील.
- जयकुमार रावळ, पणनमंत्री व एपीएमसी अध्यक्ष